सर्वगौड यांच्या आरोपावरुन दीपक पवार कडाडले
प्रतिनिधी/ सातारा
बांधकाम विभागाच्या कामामध्ये ठेकेदाराला केलेला दंड 76 हजारांवरुन 2 हजार कसा काय झाला?, बांधकाम विभागात जे कर्मचारी कामालाच नाही तरी ते काम करतात. शिक्षण विभागातही एक महिला कर्मचारी ओळखपत्र घालून काम करते, असा आरोपच शिवाजी सर्वगौड यांनी सभागृहात करताच गदारोळ माजला. त्यावर अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष धोत्रे हे सष्टीकरण देताना दीपक पवार आक्रमक झाले. त्यांनी ही जिल्हा परिषद आहे की धर्मशाळा, कोणत्याही जिल्हा परिषद सदस्यांनी ठेकेदारांना पाठीशी घालू नये, अशा शब्दात खरडपट्टी काढली. तर प्राथमिकच्या शिक्षणाधिकारी प्रभावती कोळेकर यांची कसलीही चुक नसताना त्यांच्यावर झालेल्या आरोपामुळे आणि वाढलेल्या दबावामुळे त्यांना दिलगीरी व्यक्त करावी लागली. जिल्हा परिषदेचे सदस्य सागर शिवदास यांना प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी सभागृहात आत्महत्येची धमकी द्यावी लागली.
जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा जिल्हा परिषदेचे अध्यक्ष उदय कबुले यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी उपाध्यक्ष प्रदीप विधाते, शिक्षण सभापती मानसगिंराव जगदाळे, कृषी सभापती मगेंश धुमाळ, समाजकल्याण सभापती कल्पना खाडे, महिला व बालकल्याण सभापती सोनाली पोळ, मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा आदी उपस्थित होते.सभेच्या सुरुवातीलाच शिवाजी सर्वगौड यांनी आरोपांच्या फैरी झाडायला सुरुवात केली. ठेकेदाराचा दंड 76 हजारांवरुन दोन हजारात मिटवून कसे घेतले. धैर्यशील अनपट यांनीही संतोष धोत्रे यांनी 30:54 ची कामे अडवली आहेत, असा आरोप केला. दीपक पवार यांनी त्या 76 हजाराचे काय झाले ते कळु द्या अशी मागणी केली. त्यावर अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष धोत्रे हे स्पष्टीकरण देत असताना ते भडकले म्हणाले, जिल्हा परिषद सदस्यांनी ठेकेदार चांगल काम करतो का ते पहाव. त्याला पाठीशी घालू नये, असे सांगताच सर्वगौड यांनी जिल्हा परिषदेत बाहेरचे कर्मचारी काम करतात असा आरोप करताच दीपक पवार म्हणाले, जिल्हा परिषद आहे की धर्मशाळा आहे सीईओ साहेबांनी ठेका घेतला आहे का अशा शब्दात मत प्रगट केले.
शिक्षणाधिकारी कोळेकर झाल्या विनाकारण टार्गेट
प्राथमिकच्या शिक्षणाधिकारी प्रभावती कोळेकर यांच्याबाबत काही सदस्यांना विनाकारण आरोप करण्याची पद्धत सुरु झाली आहे. त्या सदस्यांकडून झालेल्या आरोपाबाबत त्यांनी स्पष्टीकरण दिले. त्या म्हणाल्या, जिल्हा परिषदेचं मुळ बजेट 45 कोटीच शिक्षण विभागाचें 3 कोटी आहे. त्या कार्यक्रमासाठी फाईल मंजूरीला आहे, असे निक्षून सांगत होत्या. परंतु सदस्य काही ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. एकटे वसंतराव मानकुमरे पोटतिडकीने सांगत होते. केवळ शिक्षणाधिकाऱयांनी जबाबदार धरु नका, यामध्ये पदाधिकारी आणि सदस्यांचाही तेवढेच जबाबदार आहेत. त्यांनी पाठपुरावा करणे गरजेचे होते, असे सांगत सदस्यांनी जास्तच आकंडतांडव करताच मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा यांनी सुचना देताच प्राथमिकच्या शिक्षणाधिकारी प्रभावती कोळेकर यांनी दिलगिरी व्यक्त केली.
सागर शिवदास यांचा सभागृहातच आत्महत्या करण्याचा इशारा देताच विषय तहकुब
बृहत आराखडय़ात सैदापूर प्राथमिक आरोग्य केंद्राचा विषय असताना कोपर्डे हवेली येथे प्राथमिक आरोग्य केंद्र मंजूरीचा विषय वाचनात आल्याने त्यास सागर शिवदास यांनी कडाडून विरोध केला. हा विषय मंजूर झाला तर माझ्या गाडीत विषाची बाटली आहे मी विष पिन, कोणाच्या तरी दबावापोटी निकष डावलून अन्याय कराल तर खपवून घेणार नाही, असा इशारा देताच अध्यक्ष उदय कबुले यांनी अभ्यास करुन विषय पुढच्या सभेत घेवू असे सांगितले.