गाय, म्हैस, बैलांसह चार वर्षांवरील वासरांना दिली जातेय लस : 11 जानेवारीपर्यंत मोहीम
प्रतिनिधी /बेळगाव
राष्ट्रीय पशुरोग नियंत्रण कार्यक्रमांतर्गत जिल्हय़ातील 5 लाख 87 हजार 705 जनावरांना लाळय़ा खुरकत प्रतिबंधक लस देण्यात आली आहे. शिल्लक जनावरांना पहिल्या टप्प्यात 11 जानेवारीपर्यंत लस दिली जाणार आहे. गाय, म्हैस, बैल व त्यांच्या चार वर्षांवरील वासरांना ही लस दिली जात आहे. पशुपालकांनी जनावरांना लस टोचून घेवून सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले.
जिल्हय़ात 13 लाख 93 हजार 711 जनावरांना लस देण्याचे उद्दिष्ट असून त्यापैकी आतापर्यंत 5 लाख 87 हजार 705 जनावरांना लस देण्यात आली आहे. कोरोनामुळे मागील दोन वर्षांत लाळय़ा खुरकत लसीकरण मोहीम विस्कळीत झाली आहे. यंदा पहिल्या टप्प्यातील लसीकरण मोहीम झाली नाही. आता दुसऱया टप्प्यातील लांबणीवर पडलेली लसीकरण मोहीम सुरू आहे. दरम्यान, सीमाहद्दीवरील गावांमध्ये लाळय़ा खुरकत रोगाने थैमान माजविले होते. अनेक जनावरांना लागण होवून काही जनावरे दगावली होती.
लाळय़ा खुरकत हवेमार्फत फैलावतो. त्यामुळे जनावरांना लागण होते. या रोगाला रोखण्यासाठी खात्यामार्फत वर्षातून दोनवेळा प्रतिबंधक लस दिली जाते. मात्र यंदा कोरोनामुळे पहिल्या टप्प्यातील मोहीम राबविली गेली नाही. तर दुसऱया टप्प्यातील लस आता दिली जात आहे. जिल्हय़ात 42 टक्के प्रतिबंधक लस देण्याचे काम पूर्ण झाले असून उर्वरित जनावरांना लस दिली जात आहे.
जिल्हय़ातील तालुकानिहाय लसीकरण झालेली जनावरे
तालुके | एकूण जनावरे | लसीकरण झालेली जनावरे |
अथणी | 1,81,400 | 91349 |
कागवाड | 51820 | 23379 |
बैलहोंगल | 50318 | 23664 |
कित्तूर | 31718 | 13105 |
चिकोडी | 1,09,655 | 51162 |
निपाणी | 70041 | 29887 |
गोकाक | 1,09028 | 61659 |
मुडलगी | 1,17,731 | 41665 |
बेळगाव | 1,25,516 | 18468 |
हुक्केरी | 1,26,667 | 45722 |
खानापूर | 82674 | 45666 |
रामदुर्ग | 64881 | 33994 |
रायबाग | 1,57,393 | 73451 |
सौंदत्ती | 74869 | 34534 |
एकूण | 13,93,711 | 5,87,705 |