जिल्हय़ात नियोजन सुरु : लसीकरण कधी हे निश्चित नाही
प्रतिनिधी/ सातारा
सातारा जिल्हय़ात सध्या कोरोना संसर्ग आटोक्यात आला आहे. आरोग्य विभागाकडूनही अद्यापही तपासण्या सुरुच आहेत. त्यातच लसीकरणाची तयारी करण्याबाबत आदेश आल्याने प्रशासनाकडून त्याचे नियोजन सुरु आहे. जिल्हय़ात पहिल्या टप्प्यात 22 ते 23 हजार आरोग्य कर्मचारी, आशा, अंगणवाडी सेविका, शासकीय कर्मचारी, खासगी दवाखान्यातील कर्मचारी व डॉक्टर्स यांना लस देण्यात येणार आहे. मात्र, लसीकरण नेमके कधी सुरु होणार हे निश्चित नसल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुध्द आठल्ये यांनी दिली.
जिल्हय़ातील कोरोना स्थिती आटोक्यात येत आहे. मात्र, अद्यापही नागरिकांसह सर्वांनी काळजी घेण्याची आवश्यकता आहे. आरोग्य विभागाकडून बाधित रुग्णांवर उपचार सुरु आहेत. राज्य शासनाकडून लसीकरणाबाबत सूचना आल्या आहेत. त्याप्रमाणे सातारा जिह्यात प्रशासनाकडून तयारी सुरु असून या तयारीचा आढावा देखील राज्याचे कोव्हिड टास्क फोर्सचे मुख्य सल्लागार डॉ. दीपक म्हैसेकर यांनी घेतला आहे. त्या अनुषंगाने जे लस देणार आहे त्यांना प्रशिक्षण व माहिती देण्याचे काम सुरु आहे.
लसीकरणासाठी राज्यस्तरीय सुकाणू समितीनंतर राज्य कृती दल, राज्य नियंत्रण कक्ष, जिल्हास्तरावर जिल्हा कृती दल, जिल्हा नियंत्रण कक्ष, तालुकास्तरावर तालुका कृती दल आणि तालुका नियंत्रण कक्ष अशी यंत्रणा आहे. लसीकरणासाठी प्राधान्यक्रम ठरविण्यात आला असून पहिल्या गटात शासकीय आणि खासगी दवाखान्यातील आरोग्यसेवक कर्मचारी, रोजंदारीवर काम करणारे कामगार, एकात्मिक बालविकास प्रकल्पातील कर्मचाऱयांचा समावेश आहे. आरोग्य कर्मचाऱयांच्या लसीकरणासाठी नऊ गटात वर्गीकरण करण्यात आले आहे.
कोरोना लसीकरणामुळे जिल्हय़ातील नियमित लसीकरण मोहिमेला बाधा येणार नाही याची खबरदारी घेण्यात आली असून कोरोनाच्या लसीकरण मोहिमेसाठी अतिरिक्त मनुष्यबळ उपलब्ध करण्यात येत आहे. निवडणूक मतदान प्रक्रियेच्या धर्तीवर लसीकरण मोहिमेची अंमलबजावणी केली जाणार आहे. यासाठी पथके निर्माण केली जाणार आहे, प्रत्येक पथकात दोन परिचारिका, एक बहुपयोगी कर्मचारी तसेच चार जणांचा चमू तयार केला जाणार आहे. अशा पाच चमूंना मार्गदर्शन करणारा एक डॉक्टर असेल. लसीकरणानंतर काही त्रास जाणवल्यास तात्काळ उपचार करण्याची तयारीही उपलब्ध असणार आहे.
असे होणार कोरोना लसीकरण
मतदानासाठी ज्याप्रकारे बूथ असतो तसे बूथ लसीकरणासाठी करण्यात येतील आणि लसीकरणाच्या यादीत नाव असलेल्या आरोग्य कर्मचाऱयाला त्या बूथमध्ये ओळखपत्र तपासून प्रवेश दिला जाईल. लसीकरणानंतर त्या व्यक्तीच्या मोबाईलवर संदेश येईल आणि क्यूआर कोड असलेले प्रमाणपत्रदेखील पाठविण्यात येईल. आरोग्य कर्मचाऱयांच्या लसीकरणासाठी प्राथमिक आरोग्य केंद्रस्तरावर व्यवस्था करण्यात येणार असून एका ठिकाणी 100 जणांना लसीकरणाची व्यवस्था होईल.
17 जानेवारीनंतर लसीकरण सुरु होवू शकते
देशभरात दि. 17 रोजी पल्स पोलिओ लसीकरण मोहिम आहे. त्याबाबतचे नियोजन जिल्हय़ातही करण्यात आले आहे. राज्यातील काही जिल्हय़ात लसीकरण सुरु करण्यात आलेले आहे. लस दिल्यानंतर त्याचे परिणाम पाहून त्याबाबत राज्य सरकारकडून पुढील आदेश येतील त्यानुसार जिल्हय़ात कोरोना लसीकरणाबाबत नियोजनाचे काम सुरु आहे. मात्र शक्यता पल्स पोलिओ लसीकरणानंतर कोरोनाचे लसीकरण सुरु होईल, अशी शक्यता डॉ. आठल्ये यांनी वर्तवली आहे.