वारणानगर / प्रतिनिधी
पन्हाळा तालुक्यातील कोडोली– माले रोड दरम्यान माले येथील सरकारी माळरानाच्या घनदाट झाडीत आज पहाटे नुकतेच जन्मलेले स्त्री जातीचे अर्भक आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे. हे अर्भक टाकून देण्यात आल्यानं नागरिकांतून तीव्र संताप व्यक्त होत असून अर्भकाला टाकून देणाऱ्यांचा शोध पोलिसांनी सुरू केला आहे.
पन्हाळा तालुक्यात देशातील सर्वाधिक कमी स्त्रीचा जन्मदर आहे स्त्रीचा जन्मदर वाढावा यासाठी सातत्याने शासन स्तरावर प्रबोधनासह उपाय योजना सुरू आहेत. या सगळ्या उपक्रमाला मूठमाती देत स्त्री जातीचे अर्भक जीवंत फेकून अथवा टाकून देणारी माता किती कठोर ह्रदयाची असेल यावरून याची सर्व सामान्य जनतेला कल्पना करवेना झाली आहे.
दरम्यान कोडोली पोलिसांनी सदरचे जीवंत अर्भक उपजिल्हा रुग्णालय कोडोली येथे उपचार व देखभालीसाठी दाखल करून गतीने तपासाला सुरवात केल्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुरज बनसोडे यांनी सांगितले.