मडगाव इस्पितळात केस पेपरची अदलाबदल झाल्याने गोंधळ
प्रतिनिधी/ मडगाव
सध्या कोरोनाने गोव्यात कहर माजविला आहे. त्यामुळे सर्व इस्पितळातील डॉक्टर, नर्सेस तसेच इतर कर्मचाऱयांवर कामाचा प्रचंड ताण पडलेला आहे. या ताणामुळे कर्मचाऱयांकडून चुका घडू लागल्या आहेत. शुक्रवारी तर दोन रुग्णांच्या केसपेपरची अदलाबदल झाल्याने दोन कुटुंबांना मानसिक ताण सहन करावा लागला. केसपेपरची अदलाबदल झाल्याने जिवंत असलेली व्यक्ती मृत घोषित करण्यात आली तर इस्पितळात दाखल झालेली व्यक्ती गायब होऊन तिचा मृतदेह शवागरात आढळून आला.
उपलब्ध माहितीनुसार, मोहन पवार व संतोष देसाई (47) या दोघांना कोरोनाची बाधा झाल्याने व प्रकृती गंभीर असल्याने मडगावच्या जिल्हा इस्पितळात दाखल करण्यात आले होते. इस्पितळात दाखल करून घेताना त्यांच्या केसपेपरची अदलाबदल झाली. मोहन पवारचे केसपेपर संतोष देसाईच्या जागी पोचले तर संतोष देसाईचे पेपर मोहन पवारच्या जागी पोचले.
त्यात मोहन पवार यांना मृत्यू झाल्याचे जाहीर करून त्यांचा मृतदेह शवागरात पाठविण्यात आला. तर संतोष देसाई हे शुक्रवारी अचानक इस्पितळातून गायब झाले व त्याचा मृतदेह शवागरात आढळून आला. हा सर्व गोंधळ केवळ केस पेपरची अदलाबदल झाल्याने घडला. मात्र, मोहन पवार तसेच संतोष देसाईच्या कुटुंबियांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागला.
डॉ. मधु घोडकिरेकर यांच्यामुळे प्रकरण हाताळण्यात यश
मोहन पवार यांना मृत्यू आल्याची माहिती त्याच्या मुलाला देण्यात आली, तेव्हा मुलगा मठग्रामस्थ हिंदू सभेच्या स्मशानभूमीत अंत्यसंस्काराची सर्व तयारी करून मृतदेह ताब्यात घेण्यासाठी शवागरात पोचला तेव्हा त्यांना वडिलांचा मृतदेह दाखविण्यात आला. पण, हा मृतदेह आपल्या वडिलांचा नसल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे गोंधळ उडाला. शवागरात पाठविण्यात आलेला मृतदेह हा मोहन पवार यांचाच असल्याचे असल्याची कागदोपत्री नोंद होती. तर मुलगा हा आपले वडील नसल्याचे सांगू लागल्याने शवचिकित्सक डॉ. मधु घोडकिरेकर यांच्यावर ताण आला.
डॉ. घोडकिरेकर यांनी मोहनच्या मुलाला धीर दिला व त्याला घेऊन पुन्हा जिल्हा इस्पितळात गेले व सर्व वॉर्डात वडिलांचा शोध घेण्यास सुरवात केली. अर्धे अधिक वॉर्ड शोधले तरी मोहन पवार सापडेना. शेवटी शेवटच्या वॉर्डात भेट दिली असता, एका कोपऱयातील खाटीवर वडील चहा पित असल्याचे पाहून मोहन पवारचा मुलगा आनंदानेच खाली कोसळला. डॉ. घोडकिरेकर यांचाही ताण क्षणात कमी झाला.
संतोष देसाई इस्पितळातून गायब
फातर्पा येथील संतोष देसाई यांना गुरुवारी गंभीर अवस्थेत इस्पितळात दाखल करण्यात आले होते. ते गायब झाल्याचा प्रकार शुक्रवारी संध्याकाळी समोर आला. त्यांचा मोबाईल बंद असल्याने हा प्रकार उघडकीस आला. त्यानंतर रात्रभर त्यांच्या कुटुंबियांनी शोध घेतला असता शनिवारी जिल्हा इस्पितळाच्या शवागरात मृतदेह आढळून आला.
मोहन पवार व संतोष देसाई यांच्या केसपेपरची अदलाबदल झाल्याने मोहन पवारला मृत घोषित करण्यात आले. परंतु तो मृतदेह हा खरा संतोष देसाई यांचा होता. जेव्हा संतोषचे कुटुंबीय शोधाशोध करू लागले, तेव्हा डॉ. घोडकिरेकर यांनी शवागरातील मृतदेह त्यांना दाखविले. तेव्हा मोहन पवार म्हणून मृत घोषित केलेला मृतदेह हा संतोष देसाई यांचा निघाला. या प्रकारामुळे पवार व देसाई यांच्या पुटुंबियांना प्रचंड मानसिक ताण सहन करावा लागला.
असाही मनाचा मोठेपणा…
मोहन पवार यांच्या मुलाने अंत्यसंस्कारासाठी आवश्यक असलेले शुल्कदेखील भरले होते. मात्र, त्यांनी ते परत घेतले नाही. हेच शुल्क जर कोणी गरीब घराण्यातील व्यक्तीला कोरोनामुळे मृत्यू आल्यास, त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यास वापरात आणावे, असे मठग्रामस्थ हिंदू सभेला कळविले व आपल्या मनाचा मोठेपणा दाखवून दिला. ज्या मोहन पवार यांना मृत घोषित केले होते. त्यांच्या प्रकृतीत सुधारणा झाली असून आज रविवारी कदाचित त्यांना इस्पितळातून डिस्चार्ज दिला जाण्याची शक्यता आहे.