आरोग्य यंत्रणेतील कर्मचाऱयांसाठी तातडीची खरेदी : अध्यक्षांच्या हस्ते वितरण
प्रतिनिधी / सिंधुदुर्गनगरी:
सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेने जिल्हय़ात काम करणाऱया आरोग्य यंत्रणेतील कर्मचाऱयांसाठी कोरोना साथीच्या पार्श्वभूमीवर औषध आणि साहित्याची तातडीची खरेदी केली आहे. जि. प. ने 425 पीपीटी किटस् खरेदी केली असून त्याचे वितरण बुधवारी जि. प. अध्यक्ष सौ. समिधा नाईक व उपाध्यक्ष राजेंद्र म्हापसेकर यांच्या हस्ते व विषय सभापतींच्या उपस्थितीत झाले. दरम्यान आमदार नीतेश राणे यांनीही जि. प. च्या वैद्यकीय अधिकाऱयांसाठी 76 पीपीटी किटस् दिले असून त्यांचेही वितरण झाले.
यावेळी सभापती बाळा जठार, माधुरी बांदेकर, शारदा कांबळे, सावी लोके, रेश्मा सावंत हे पदाधिकारी आणि जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. महेश खलिपे उपस्थित होते. कोरोना साथीची पार्श्वभूमी लक्षात घेऊन जिल्हा परिषदेने ट्रिपल लेअर 20 हजार मास्क, 25 हजार कॉटन मास्क, 508 सॅनिटायझर किटस्, 25 हजार हँन्डग्लोव्हज, 33 हजार सोडियम हायड्रोक्लोराईड बॉटल आणि आरोग्य सेवा देणाऱया अधिकारी आणि कर्मचाऱयांसाठी 5000 हायड्रोक्सीक्लोरीक्वीन गोळय़ा जि. प. ने तातडीने खरेदी केल्या आहेत. त्याचेही वाटप प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचाऱयांसाठी करण्यात आले. जिल्हा नियोजन समितीकडून 75 लाख रुपये, तर आमदार नीतेश राणे यांनी 34 लाख व आमदार दीपक केसरकर यांनी 34 लाख निधी यासाठी उपलब्ध करून दिला आहे. या निधीतून ही औषधे व साहित्य खरेदी करण्यात आल्याची माहिती जि. प. अध्यक्षांनी दिली.
जिल्हा परिषदेची आरोग्य यंत्रणा सतर्क असून जिल्हावासीयांनी कोरोना साथीला घाबरून जाऊ नये. प्रशासन आणि पोलीस यांच्यासह आरोग्य यंत्रणेतील अधिकारी आणि कर्मचाऱयांना नागरिकांनी सहकार्य करावे. नागरिकांनीही योग्य ती दक्षता घ्यावी, असे आवाहनही सौ. नाईक यांनी केले.