पंतप्रधान सहाय्यता निधीला पाठविली रक्कम
प्रतिनिधी/ बेळगाव
कोरोना महामारीशी मुकाबला करण्यासाठी विविध संघ-संस्था आणि नागरिकांद्वारे मदत करण्यात येत आहे. पंतप्रधान सहाय्यता निधी आणि मुख्यमंत्री मदतनिधीला आपल्या परिने मदत देण्यात येत आहे. मात्र जीआयटी कॉलेजच्या (एमबीए) माजी विद्यार्थ्यांनी सोशल मिडिया व्हॉट्सऍपद्वारे मदतनिधी जमा करून पंतप्रधान सहाय्यता निधीला पाठविली आहे. जीआयटी कॉलेजच्या 2012 च्या 40 माजी विद्यार्थ्यांनी 26 हजार रुपयांची मदत ऑनलाईनद्वारे पंतप्रधान सहाय्यता निधीला पाठविली आहे.
या कॉलेजचे माजी विद्यार्थी सध्या वेगवेगळय़ा ठिकाणी व विविध क्षेत्रात कार्यरत आहेत. काही विद्यार्थी परदेशातही आहेत. या सर्व वर्गमित्रांचा व्हॉट्सऍप ग्रूप असून याद्वारे चर्चा करून प्रत्येकी 121 रुपये जमा करण्याचे ठरविले होते. काही विद्यार्थ्यांनी त्यापेक्षाही अधिक मदत जमा केली. त्यातील धारवाडची माजी विद्यार्थीनी व सध्या कॅलिफोर्निया (अमेरिका) येथे वास्तव्यास असणाऱया तारा कमलापूर हिने पाच हजार रुपयांची मदत पाठविली आहे. देशाप्रती आमचेही काही देणे लागते. यासाठी मित्रांशी चर्चा करून पंतप्रधान सहाय्यता निधीला मदत करण्याचा निर्णय घेण्यात आला. यामध्ये सर्वच मित्रांनी मदतीचा हात पुढे केला आहे, असे जीआयटी कॉलेजचे माजी विद्यार्थी भूषण कुंभार यांनी ‘तरुण भारत’ प्रतिनिधीशी बोलताना सांगितले..