क्रीडा प्रतिनिधी / मडगाव
गोवा विकास फुटबॉल कौन्सिलच्या (जीएफडीसी) कामकाजात पारदर्शकता तसेच ग्राशरूट फुटबॉल आणि फुटबॉल प्रशिक्षकांना प्राथमिकता देणार असल्याचे जीएफडीसीचे नवनिर्वाचित चेअरमन अर्जुन पुरस्कार विजेते ब्रम्हानंद शंखवाळकर यांनी म्हटले आहे. फुटबॉल प्रशिक्षण शिक्षणाला नेहमीच जीएफडीसीने प्राधान्य दिले आहे. कोविडची महामारी संपल्यानंतर कुमार फुटबॉलपटू फुटबॉलचा आनंद घेतील, असे ते म्हणाले.
कोविडमुळे संपूर्ण जगातील क्रीडा क्षेत्र बंद आहे. या महामारीमुळे बाधा झालेल्यांची संख्याही दिवसेदिवस वाढत आहे. यामुळे फुटबॉल कधी सुरू होणार हे निश्चितपणे कोणीच सांगू शकणार नाहीत, मात्र लवकरच फुटबॉल मोठय़ा दिमाखात परतणार असल्याचे शंखवाळकर म्हणाले.
आठ वर्षांपूर्वी तत्कालीन मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी राज्यातील फुटबॉल विकासार्थ जीएफडीसीची स्थापना करून विधानसभेत ठराव संमत करून फुटबॉल खेळाला राज्य खेळाचा दर्जा दिला होता आणि जीएफडीसीच्या चेअरमनपदी डॉ. रुफिनो मोंतेराची निवड केली होती. नोव्हेंबर 2018 मध्ये मोंतेरोने अध्यक्षपदाचा राजिनामा दिल्यानंतर हे पद रिक्त होते.
त्यानंतर शासनाच्या एका आदेशाद्वारे जीएफडीसीची पुर्नरचना करण्यात आली होती. आलेक्सो दा कॉस्ता यांची सदस्य सचिवपदी निवड कायम ठेवण्यात आली तर डॉ. ंश्रीकांत आजगावकर यांची उपाध्यक्षदी करण्यात आली आहे. मंडळावर माजी मंत्री आवेर्तान फुर्तादो, ब्रुनो कुतिन्हो, ज्यॉवितो लोपीश, लाविनो रिबेलो, लेक्टर मास्कारेन्हस, शांताराम नाईक, संजीव नागवेकर व प्रदीप चोडणकर यांचा समावेश आहे.