वेंगुर्ल्यात पालव कुटुंबासाठी तिघे बनले ‘तारणहार’ :
के. जी. गावडे / वेंगुर्ले:
वेंगुर्ले वडखोल येथील सचिन भालचंद्र पालव एक अंध युवक. दीड वर्षापूर्वी त्याच्या दोन्ही किडन्या फेल झाल्याने त्याला त्याच्या आईची एक किडनी बसविण्यात आली होती. गरीब परिस्थिती, त्यातच किडनीच्या ऑपरेशनसाठी व औषधांसाठी झालेला 20 लाख रुपयांचा खर्च. त्यामुळे पालव कुटुंब मेटाकुटीस आलेले. सचिनसाठी लागणारी औषधे स्पीड पोस्टाद्वारे मागविण्यात येत असत. यावेळी त्यांनी मागविलेल्या गोळय़ा लॉकडाऊनमुळे गोव्यातच अडकल्या. गोळय़ा न मिळाल्यास प्रत्यारोपण केलेली किडनी फेल होण्याचा धोका असल्याने पालव कुटुंब हवालदील झाले. त्याचवेळी नगरसेविका शीतल आंगचेकर, न. प. मुख्याधिकारी वैभव साबळे व वेंगुर्ले पोस्टमास्तर प्रकाश गावडे यांनी गोव्यात अडकलेले गोळय़ांचे पार्सल पालव कुटुंबाच्या घरपोच आणून दिले अन् त्यांचा जीव भांडय़ात पडला.
सचिन पालव हा युवक अंध असला, तरी उत्कृष्ट पखवाज व हार्मोनियम वादक म्हणून प्रसिद्ध आहे. हार्मोनियम, पखवाजचे तो क्लासही घेतो. डिसेंबर 2018 मध्ये त्याच्या दोन्ही किडन्या खराब झाल्याने गिरगावातील एक्सएन रिलायन्स फाऊंडेशनच्या हॉस्पिटलमध्ये त्याच्यावर किडनीचे ऑपरेशन झाले. त्याच्या आईने आपली एक किडनी मुलाला देऊन त्याचे प्राण वाचवले. यावेळी ऑपरेशनसाठी दहा लाख व औषधांसाठी दहा लाख रु. खर्च झाला होता. घरची गरीब परिस्थिती असल्याने व दर दोन महिन्यांनी चेकअपसाठी जावे लागत असल्याने ऑपरेशननंतर सहा महिने ते दहिसर येथील आपल्या मामाकडे राहिले. त्यानंतर 2019 मध्ये ते गावी आले. गावी आल्यावर एकदोनवेळा ते मुंबईला चेकिंगसाठी गेले. मात्र, दरमहा गोळय़ांचा 20 हजार रुपये खर्च व मुंबईला जाण्या-येण्याचा प्रवास खर्च व अन्य खर्च परवडत नसल्याने अलीकडे ते आपल्या गोळय़ा स्पीडपोस्टद्वारे मागवित असत.
यावेळी 19 मार्चला त्यांनी आपल्या गोळय़ा मागविल्या होत्या. त्या गोळय़ांचे पार्सल 22 मार्चला पणजी (गोवा) येथे आले. मात्र त्यानंतर लॉकडाऊन जाहीर झाल्याने त्यांच्या गोळय़ा गोव्यात अडकल्या. सिंधुदुर्ग जिल्हय़ात या गोळय़ा मिळत नाहीत. पूर्वी आणलेल्या गोळय़ा संपत आलेल्या. अन गोळय़ा न मिळाल्यास प्रत्यारोपण केलेली किडनी फेल होण्याचा धोका. त्यामुळे पालव कुटुंब गर्भगळीत झाले. त्यांनी ही गोष्ट स्थानिक नगरसेविका शीतल आंगचेकर यांना सांगितली. आंगचेकर यांनी मुख्याधिकारी यांना याची कल्पना दिली. सदरची औषधे आणण्यासाठी न. प. ने विशेष प्रयत्न केले. परंतु, राज्याची हद्द ओलांडण्यासाठी विशेष परवानगी देण्याचे अधिकार मुंबई येथील कार्यालयाला असल्याने ते शक्य झाले नाही. त्यामुळे वेंगुर्ले पोस्टमास्तर प्रकाश गावडे यांना याबाबत प्रयत्न करण्याची विनंती करण्यात आली. गावडे यांनी विशेष प्रयत्न करून गोवा येथे अडकलेली औषधे कुडाळ पोस्ट ऑफिसमध्ये मागवून घेतली. 7 एप्रिल रोजी सकाळी नगर परिषदेच्या वाहनातून ती औषधे कुडाळहून आणून सचिन पालव यांना देण्यात आली. नगरसेविका शीतल आंगचेकर, मुख्याधिकारी वैभव साबळे व पोस्टमास्तर यांनी केलेल्या धावपळीमुळेच सचिनचे प्राण वाचले. पालव कुटुबियांच्या दृष्टीने हे तिघेही देवदूत ठरले.