वृत्तसंस्था/ नवी दिल्ली :
कोरोनाच्या वाढत्या संसर्गाला रोखण्यासाठी जगभरातील विविध कंपन्या सध्या कोरोनाला थोपवणाऱया उत्पादनांची निर्मिती करण्यासाठी आपला वेळ खर्च करत आहेत. यामध्ये जेके टायर ऍण्ड इंडस्ट्रीजची आता भर पडली आहे. हॅण्ड सॅनिटायझरची निर्मिती करून सादरीकरण करणार असल्याचे कंपनीने बुधवारी सांगितले आहे.
कंपनीने दिलेल्या माहितीनुसार कंपनीच्या तंत्रज्ञान केंद्रामध्ये या उत्पादनास विकसित करण्यात येणार आहे. याचे संपूर्ण नियंत्रण जागतिक आरोग्य केंद्राच्या नियमावलीनुसार करण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले आहे.
यासाठी आवश्यक असणारा परवाना येत्या आठ दिवसांच्या आत प्राप्त होणार असल्याचे कंपनीचे अध्यक्ष रघुपती सिंघानिया यांनी म्हटले आहे.