प्रतिनिधी /पणजी
भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा हे शुक्रवार व शनिवार म्हणचे उद्या दि. 23 व परवा दि. 24 जुलै रोजी गोवा भेटीवर येत आहेत. आगामी विधानसभा निवडणुकीची तयारी करण्यासाठी तसेच रणनिती ठरवण्यासाठी त्यांची गोवा भेट महत्त्वाची आहे.
भाजपचे गोव्यातील सर्व आमदार, मंत्री, पदाधिकारी, प्रमुख कार्यकर्ते यांच्या ते गाठीभेटी घेणार असून बैठकाही आखण्यात आल्या आहेत. नड्डा यांची गोवा भेट दोन वेळा निश्चित झाली होती परंतु काही कारणांमुळे दोन्हीवेळा त्यांचा दौरा रद्द झाला होता. आता तिसऱयांदा त्यांची गोवा भेट ठरली असून ते येणार असल्याची खात्री भाजपाच्या सुत्रांनी दिली आहे. काही मतदारसंघात भाजपच्या उमेदवारीवरुन रुसवेफुगवे वाढत असून बंडखोरीचा धोका उद्भवत असल्याचे चित्र आहे. ते रुसवेफुगवे, संभाव्य बंडखोरी शांत करण्यासाठी तसेच युतीसंदर्भात स्थानिक भाजप नेतेमंडळीचे म्हणणे ऐकून त्याबाबात काय करायचे यावरही चर्चा होणार असल्याचे संकेत मिळत आहेत. गोव्यातील भाजपची सत्ता टिकवणे हाच त्यांचा गोवा दौऱयाचा मुख्य उद्देश आहे. भाजपला कोणत्याही परिस्थितीत बहुमत मिळाले पाहिजे व त्यासाठी वाटेल ते करा हाच संदेश ते देणार अहेत. असे भाजपच्या सुत्रांनी सांगितले. मागील 2017 च्या विधानसभा निवडणुकीत बहुमत भाजपच्या हातातून निसटले होते. ते प्राप्त करण्याचा भाजपचा प्रयत्न आहे.