बार्टी, ओसाका पराभूत, ओसाकाची ब्रेक घेण्याची घोषणा
वृत्तसंस्था/ न्यूयॉर्क
सर्बियाचा टॉप सिडेड जोकोविच तसेच कॅनडाची बियान्का अँड्रीस्क्यू यांनी येथे सुरू असलेल्या अमेरिकन ग्रँडस्लॅम टेनिस स्पर्धेत चौथ्या फेरीत प्रवेश मिळविला. ऑस्ट्रेलियाची टॉप सिडेड ऍश्ले बार्टी, जपानचे निशीकोरी आणि नाओमी ओसाका यांना पराभवाला सामोरे जावे लागले. भारताच्या रोहन बोपण्णा आणि क्रोएशियाचा डोडीग यांनी पुरुष दुहेरीची उपउपांत्यपूर्व फेरी गाठली आहे.
पुरुष एकेरीच्या तिसऱया फेरीतील सामन्यात जोकोविचने जपानच्या निशीकोरीवर 6-7 (4-7), 6-3, 6-3, 6-2 अशा सेट्समध्ये मात केली. जोकोविचचा निशीकोरीवरील हा सलग 17 वा विजय आहे. टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत जोकोविचने निशीकोरीचा पराभव केला होता.
महिला एकेरीच्या तिसऱया फेरीतील सामन्यात शनिवारी धक्कादायक निकाल शौकिनांना पाहावयास मिळाले. अमेरिकेच्या शेल्बी रॉजर्सने ऑस्ट्रेलियाच्या टॉप सिडेड बार्टीचे आव्हान 6-2, 1-6, 7-6 (7-5) असे संपुष्टात आणत चौथ्या फेरीत स्थान मिळविले. या दोन खेळाडूमध्ये यापूर्वी सहावेळा गाठ पडली होती पण बार्टीला या स्पर्धेत पहिल्यांदाच रॉजर्सकडून हार पत्करावी लागली. तिसऱया फेरीतील अन्य एका सामन्यात कॅनडाच्या बियान्का अँड्रीस्क्यूने बेल्जियमच्या मिनेनचा 6-1, 6-2 असा पराभव करत पुढील फेरीत स्थान मिळविले. आतापर्यंत चार ग्रँडस्लॅम अजिंक्यपदे मिळविणाऱया जपानच्या नाओमी ओसाकालाही तिसऱया फेरीत कॅनडाच्या फर्नांडीसकडून पराभवाला सामोरे जावे लागले. लैला फर्नांडिसने ओसाकावर 5-7 7-6 (7-2), 6-4 अशी मात केली. ओसाकाने या पराभवानंतर टेनिसपासून काही काळासाठी ब्रेक घेणार असल्याचे जाहीर केले.
पुरुष दुहेरीच्या विभागात भारताचा रोहन बोपण्णा आणि त्याचा क्रोएशियन साथीदार डोडीग यांनी उपउपांत्यपूर्व फेरीत स्थान मिळविले. बोपण्णा-डोडीग यांनी मोनॅकोचा नियेस आणि फ्रान्सचा रिंडरकेंच यांचा 56 मिनिटांच्या कालावधीत 6-3, 4-6, 6-4 असा पराभव केला. या स्पर्धेत भारताच्या सानिया मिर्झाचे मिश्र दुहेरी आणि महिला दुहेरीतील आव्हान यापूर्वीच समाप्त झाले आहे.