अभ्यासाबरोबरच प्रत्यक्ष कृतीतून मुलांना अधिक चांगले शिकण्यासाठी अशा प्रयोगशाळांचा उपयोग
प्रतिनिधी/ बेळगाव
ज्ञान प्रबोधन मंदिर विद्यालयात नुकतेच अटल टिंकरिंग लॅबचे उद्घाटन झाले. केंद्र शासनाच्या योजनेंतर्गत मंजूर झालेल्या या प्रयोगशाळेचा शुभारंभ ‘तरुण भारत’ ट्रस्टचे अध्यक्ष किरण ठाकुर यांच्या हस्ते करण्यात आला. याप्रसंगी जी. एस. एस. कॉलेजचे प्रयोगशील प्राध्यापक प्रवीण पाटील हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
याप्रसंगी सर्वांचे अभिनंदन करून किरण ठाकुर म्हणाले, अभ्यासाबरोबरच प्रत्यक्ष कृतीतून मुलांना अधिक चांगले शिकता येईल. त्यासाठी अशा प्रयोगशाळांचा चांगला उपयोग होईल. विद्यार्थ्यांनी इथे शिकून, प्रयोग करून उद्यमशील व्हावे. त्यातूनच नव्या आणि स्वावलंबी भारताची उभारणी होणार आहे.
सेक्रेटरी जगदीश कुंटे यांनी सांगितले की, टिंकरिंग याचा शब्दशः अर्थ मोडतोडजोड. अशा कारभारातूनच मुले शिकत असतात. अशा शिकण्याला वाव मिळाला तर त्यातूनच पुढे नवे शास्त्रज्ञ तयार होतील.
प्रा. प्रवीण पाटील यांनी त्यांच्या ‘Seelablet’ या संकल्पनेची माहिती दिली. त्याचबरोबर या संकल्पनेचे छोटे स्वरुप म्हणजे ‘EXPEYES’ चे प्रात्यक्षिक करून दाखविले. छोटय़ा छोटय़ा बिनखर्चिक वस्तू वापरून नवनवे प्रयोग कसे करता येतील याची माहितीही प्रा. पाटील यांनी दिली.
मुलांच्या कल्पनाशक्तीला वाव देणारी लॅब
मुलांच्या कल्पनाशक्तीला वाव देणाऱया या लॅबमध्ये मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स, मॅग्नेटिक, साऊंड तसेच सॉईल टेस्टिंगची साधने उपलब्ध आहेत. मुलांचा आवडता विषय म्हणजे रोबोटिक्स याची सुविधा आहे. ऑडिओ-व्हिज्युअल लर्निंग सेंटर आणि विविध वर्क स्टेशन्स तसेच थ्रीडी प्रिंटिंग करण्याची साधने आहेत. नव्या शिक्षण प्रणालीसाठी ही प्रयोगशाळा अत्यंत उपयुक्त ठरणार आहे.
या प्रयोगशाळेची उभारणी निरंजन देसाई यांनी केली आहे. त्यांना शाळेचे विज्ञानशिक्षक मारुती अंबाजी, महादेव गुरव आणि सेव्हिल मार्क यांचे सहकार्य आणि प्रशासक डॉ. गोविंद वेलिंग यांचे मार्गदर्शन लाभले.
याप्रसंगी संचालक अनिल चौधरी, नितीन कपिलेश्वरकर, गिरीधर रविशंकर, मुख्याध्यापिका मंजिरी रानडे आणि शिक्षक वर्ग उपस्थित होता.