मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्याकडून नवीन योजनेची घोषणा : कांपाल येथे जागतिक पर्यावरण दिनानिमित्त मोफत झाडे वाटप कार्यक्रम,कमर्शियल प्लांटेशनला मान्यता
प्रतिनिधी / पणजी
सागवानसारखी कमर्शियल झाडे लावली तर नंतर कापायला परवाना मिळत नाही, अशी तक्रार असल्याने लोक वृक्षारोपण करीत नाहीत. त्यामुळे आता वनखात्याने कर्मशियल व्हायेबल वृक्षारोपण योजना जाहीर केली असून आपल्या खासगी जागेत हवी तेवढी झाडे लावा व ती लावतानाच कापण्याचा परवाना घ्या, अशी घोषणा मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी जागतिक पर्यावरण दिनानिमित्त कांपाल येथे झालेल्या कार्यक्रमावेळी केली.
आंबा, फणस, जांभूळ, आवळा, भिरंड, चिंच, चंदन, पेरु यासारखी झाडे मोफत देण्याची योजना असून प्रत्येकाला 5 झाडे मोफत मिळणार आहेत. फक्त नावनोंदणी करुन ही झाडे घेऊन जावी. वनऔषधी झाडेही असून तीही मोफत दिली जात असल्याचे त्यांनी जाहीर केले.
गोव्यातील 40 ही मतदारसंघात मोफत वृक्ष वाटण्याचा कार्यक्रम 5 जूनपासून सुरु होत असून पुढील तीन महिन्यांत वन खात्याच्या कार्यालयात उपलब्ध असतील, असे ते म्हणाले.
कमर्शियल प्लांटेशनला मान्यता
झाडे कापण्यासाठी मान्यता मिळत नाही म्हणून आपल्या खासगी जमिनीत कमर्शियल प्लांटेशन केले जात नव्हते. आता ऑनलाईन पोर्टल तयार करण्यात आले असून झाडे लावतानाच ऑनलाईन मान्यता घ्यावी आणि झाडे कापण्याची वेळ आली की सदर ऑनलाईन प्रमाणपत्र सादर करुन झाडे कापावीत. नव्याने परवाना घेण्याची आवश्यकता नसल्याचे ते म्हणाले.
इकोसिस्टीम रिस्टोरेशन
यंदाच्या जागतिक पर्यावरण दिनाचा यंदाचा विषय इकोसिस्टीम रिस्टोरेशन असा असून वन खातेच नव्हे तर प्रत्येक पर्यावरणप्रेमींची मदत घेऊन हे ध्येय साध्य केले जाईल, असे ते म्हणाले. फक्त झाडेच नव्हे तर इतर प्रजातीचे रक्षण आणि रिस्टोरेशन पूनर्स्थापनेचे लक्ष पूर्ण करुया, असे ते म्हणाले.
तीन अधिकाऱयांचा सन्मान
वन खात्याचे तीन अधिकारी उसगांव येथील देऊ शेटकर, दक्षिण गोवा कोंडीमळ येथील सिरिलियो नरोन्हा व सॉईल कंझरवेटर विभागातील अधिकारी गोकुळदास गावडे यांचा पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. अर्जुन अदित हा विद्यार्थी गोव्यात पीएचडी करताना त्याने पणजी शहरातील 134 झाडांच्या जाती शोधल्या. हे पुस्तक वनखात्याने प्रकाशित केले असून मुख्यमंत्र्यांहस्ते त्याचे प्रकाशन झाले. त्याचबरोबर मेजिकल इम्युनिटी हर्ब ही पुस्तिका प्रकाशित केली. ज्यात रोगप्रतिकार शक्तीचे गुणधर्म असलेल्या औषधांची माहिती देण्यात आली आहे.
या कार्यक्रमाला राज्याचे मुख्य सचिव परिमल राय तसेच पणजीचे महापौर रोहीत मोन्सेरात, उपमहापौर वसंत आगशीकर, मुख्य वनपाल सुभाषचंद्र, अतिरिक्त मुख्य वनपाल व मुख्य वन्य जीवरक्षक संतोष कुमार हजर होते. वनअधिकारी अमर हेबळेकर यांनी सूत्रसंचालन केले व आभार मानले. विजय भजे, अमृत चोडणकर, युसोबियो डिसोझा, गोपिनाथ धुरी, शॉन रॉड्रिग्स व क्रिस्टल डिसिल्वा यांना प्रातिनिधिक वृक्ष वाटप करण्यात आले.
यापुढे गोव्याला अग्रस्थानी आणण्यास झटू : मुख्यमंत्री
नीती आयोगाच्या अहवालात गोव्याला तिसरे स्थान प्राप्त झाल्याचे श्रेय फक्त मुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळाला मिळत नसून प्रत्येक अधिकारी त्यासाठी झटला आहे. यापुढे गोव्याला पहिल्या स्थानी आणण्यासाठी लगेच बैठका घ्यायला सुरुवात केली जाईल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केले. जागतिक पर्यावरण दिनाच्या सोहळ्य़ानंतर अनौपचारिकरित्या पत्रकारांशी ते बोलत होते.
गोवा हे लहान राज्य असून विकासाच्या प्रत्येक पायरीवर बारीक लक्ष ठेवल्यास विकास झपाटय़ाने तर होतोच त्याशिवाय दर्जाही सर्वोत्तम राहतो, असे ते म्हणाले. ज्या हिरीरिने प्रत्येकजण कामाला लागला होता, नियमित बैठका घेऊन आढावा घेतला जात होता त्यावरुन यंदा गोव्याला पहिल्या पाच क्रमांकात स्थान मिळणारच अशी आपल्याला खात्री होती. पेयजल आणि स्वच्छता यावरील निकषात गोव्याला पहिला क्रमांक मिळाला आहे. याचे श्रेय जनतेच्या सहकार्यालयाच लाभते, असे ते म्हणाले.
जनतेचा सरकारवर असलेला विश्वास आणि प्रशासनाने साधलेली प्रगती यातून स्पष्ट होते. नेहमी आंधळेपणाने टीका करणाऱयांच्या डोळ्य़ात हे अंजन असून यापुढे गोव्याला अग्रस्थानी आणण्यास झटू, असे ते म्हणाले.