बाकू / वृत्तसंस्था
युरो चषक फुटबॉल चॅम्पियनशिपमध्ये झेक प्रजासत्ताक व डेन्मार्कचे संघ आज (शनिवार दि. 3) उपांत्यपूर्व फेरीत आमनेसामने भिडतील. यापूर्वी उपउपांत्यपूर्व लढतीत डेन्मार्कने वेल्सला 4-0 अशा एकतर्फी फरकाने नमवले तर झेक प्रजासत्ताकने नेदरलँडस्ला 2-0 असे नमवत आगेकूच केली. आजचा सामना भारतीय प्रमाणवेळेनुसार, रात्री 9.30 वाजता होईल.
झेकने या स्पर्धेत 14 जून रोजी स्कॉटलंडचा 2-0 असा धुव्वा उडवत दमदार सुरुवात केली. नंतर क्रोएशियाविरुद्ध एक गुण वसूल करत आपली गटातील स्थिती भक्कम केली. त्यांना इंग्लंडविरुद्ध पराभव पत्करावा लागला. पुढे, बुडापेस्टमधील लढतीत नेदरलँडस्चे पारडे जड मानले जात होते. मात्र, प्रत्यक्षात झेकने एकतर्फी विजय नोंदवत आगेकूच केली. झेकने यापूर्वी 1996 मध्ये उपजेतेपदापर्यंत मजल मारली व 2004 मध्ये सेमीफायनल गाठले होते. 2016 मध्ये मात्र त्यांना साखळी फेरीतच गारद होण्याची नामुष्की पत्करावी लागली होती. झेकला डेन्मार्कविरुद्ध मागील 25 पैकी केवळ 2 सामन्यातच पराभवाचा सामना करावा लागला असून आज विजय संपादन करणाऱया संघाची उपांत्य लढत इंग्लंड-युक्रेन यांच्यातील विजयी संघाविरुद्ध होणार आहे.
दुसरीकडे, डेन्मार्क संघाला साखळी फेरीत 2 सामने गमवावे लागले होते. त्यांना फिनलँड व बेल्जियमविरुद्ध अपयश आले. मात्र, त्यानंतर चारच दिवसांनी रशियाचा 4-1 असा धुव्वा उडवत हा संघ साखळी फेरीअखेर बेल्जियमपाठोपाठ दुसऱया स्थानी राहिला व उपउपांत्यपूर्व फेरीत पोहोचला. ऍमस्टरडॅममधील बाद फेरीतील पहिल्या लढतीत वेल्सचा 4-0 असा उडवलेला धुव्वा त्यांच्या लाजवाब खेळाची प्रचिती देणारा ठरला. कॅस्पर डोल्बर्गचे दुहेरी गोल वैशिष्टय़पूर्ण ठरले.
डेन्मार्कने 1992 मध्ये युरो स्पर्धा जिंकली. मात्र, 2004 नंतर त्यांना एकदाही उपांत्यपूर्व फेरीपर्यंतही पोहोचता आले नाही. हा संघ 2008 व 2016 मध्ये फायनल्ससाठी पात्र ठरला नाही व 2012 मध्ये साखळी फेरीतच गारद होण्याची नामुष्की त्यांच्यावर आली होती.
अद्याप एकही गोल न स्वीकारणाऱया इंग्लंडची आज युक्रेनविरुद्ध लढत
रोम ः जर्मनीसारख्या बलाढय़ संघाला नमवत आगेकूच करणाऱया इंग्लंडसमोर आज चौथ्या व शेवटच्या उपांत्यपूर्व लढतीत युक्रेनचे आव्हान असणार आहे. यापूर्वी जर्मनीविरुद्ध लढतीत रहीम स्टर्लिंग व हॅरी केन यांच्या दुसऱया सत्रातील गोलांमुळे इंग्लंडने बाजी मारली होती. या उभय प्रतिस्पर्ध्यांत 55 वर्षातील ही पहिलीच नॉकआऊट तर मागील 2 दशकातील पहिलीच व्यावसायिक लढत होती. गॅरेथ साऊथगेट यांचे प्रशिक्षण लाभत असलेल्या इंग्लंडने या युरो हंगामात अद्याप एकही गोल स्वीकारलेला नाही आणि असा पराक्रम करणारा तो एकमेव संघ आहे.
साखळी फेरीत ड गटात समाविष्ट इंग्लंडने क्रोएशियाचा व झेक प्रजासत्ताकचा 1-0 असा पराभव केला आणि स्कॉटलंडविरुद्ध गोलशून्य बरोबरी राखली. त्यानंतर उपउपांत्यपूर्व फेरीत जर्मनीला 2-0 असे नमवत आगेकूच केली. आता युक्रेनविरुद्ध त्यांची उपांत्यपूर्व लढत होत आहे. युक्रेनचा संघ साखळी फेरीत क गटात नेदरलँडस्, ऑस्ट्रिया यांच्यानंतर तिसऱया स्थानी राहिला होता. पुढे, ग्लास्गो येथे एक्स्ट्रा टाईमपर्यंत रंगलेल्या उपउपांत्यपूर्व लढतीत त्यांनी स्वीडनचा 2-1 असा पराभव केला. आता इटालियन राजधानीत इंग्लंडविरुद्ध त्यांचा आणखी एक महत्त्वाचा सामना रंगेल. भारतीय प्रमाणवेळेनुसार, मध्यरात्री 12.30 वाजता ही लढत होणार आहे.
आजचे उपांत्यपूर्व सामने
1) डेन्मार्क वि. झेक प्रजासत्ताक
वेळ ः रात्री 9.30 वाजता
स्थळ ः बाकू
2) इंग्लंड वि. युक्रेन
वेळ ः मध्यरात्री 12.30 वाजता
स्थळ ः रोम.