गळतगा पोलिसांची कारवाई , दोन टाटासुमोसह साडेआठ लाखांचा ऐवज जप्त
प्रतिनिधी /बेळगाव
रस्ता शेजारी व शेतवडीत उभी करण्यात आलेल्या ट्रक्टरचे टायर चोरणाऱया सात जणांच्या टोळीला अटक करण्यात आली आहे. गळतगा पोलिसांनी ही कारवाई केली असून त्यांच्या जवळून 8 लाख 61 हजार 300 रुपये किंमतीचा ऐवज जप्त करण्यात आला आहे. जिल्हा पोलीस प्रमुख लक्ष्मण निंबरगी यांनी ही माहिती दिली आहे.
मारुती बसाप्पा टोण्णी (वय 24, रा. गळतगा), संजू बिष्टाप्पा अंबडगट्टी (वय 28, रा. कक्केरी), संतोष यल्लाप्पा नागण्णावर (वय 26, रा. घष्टोळी-दड्डी), महादेव मुरारी माकाळे (वय 27, रा. गळतगा), बाबु सिध्दाप्पा ढाले (वय 37, रा. गळतगा), श्रावण सोमलिंग हुलमनी (वय 20, रा. कक्केरी), शिवानंद मारुती गजबर (वय 29, रा. गळतगा) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत.
मारुती हा व्यवसायाने वाहन चालक आहे. संतोष मोटार वाईंडींगचे काम करतो. संजू, बाबु व शिवानंद हे शेती करतात. महादेव बकरी राखतो. श्रावण गवंडी काम करतो. या सात जणांना टायर चोरी प्रकरणी अटक झाली असल्याची माहिती जिल्हा पोलीस प्रमुख लक्ष्मण निंबरगी यांनी दिली.
खडकलाट, निपाणी, सदलगा, हुक्केरी, संकेश्वर, यमकनमर्डी, चिकोडी, अंकली, कित्तूर, हारुगीरी पोलीस स्थानकाच्या कार्यक्षेत्रात या टोळीने चोरलेले 46 टायर जप्त करण्यात आले आहेत. हे सर्व टायर टिस्कसह पोलिसांनी जप्त केले आहेत. रस्त्या शेजारी किंवा शेतवडीतील घरासमोर उभी करण्यात आलेल्या ट्रक्टरचे टायर खोलण्यात या टोळीचा हातखंडा आहे.
पोलिसांनी दोन टाटासुमो, 46 टायर, चार विटा, जॅक, पान्हे, टॉमी जप्त केले आहेत. चिकोडीचे पोलीस उपअधिक्षक मनोजकुमार यांच्या मार्गदर्शनाखाली खडकलाटचे पोलीस उपनिरीक्षक एस. एस. मंटूर, निपाणी ग्रामीणचे पोलीस उपनिरीक्षक बी. एस. तळवार व त्यांच्या सहकाऱयांनी ही कारवाई केली आहे.