बेळगाव शैक्षणिक जिल्हय़ातून 7 हजार 120 विद्यार्थी देणार परीक्षा : 23 केंद्रांवर नियोजन
प्रतिनिधी/ बेळगाव
शिक्षक भरतीच्या प्रतीक्षेत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी शिक्षक भरतीची पहिली पायरी असणाऱया शिक्षक पात्रता परीक्षेचा मार्ग मोकळा झाला आहे. तारीख पे तारीख आणि प्रतीक्षेचे ग्रहण लागलेली टीईटी रविवार दि. 4 ऑक्टोबर रोजी होणार आहे. बेळगाव शैक्षणिक जिल्हय़ातून एकूण 7 हजार 120 विद्यार्थी टीईटी देणार असून एकूण 23 केंद्रांवर परीक्षा होणार आहे.
डीएड, बीएड उत्तीर्ण विद्यार्थ्यांना शिक्षक म्हणून सेवेत रुजू होण्यापूर्वी शिक्षक पात्रता परीक्षा उत्तीर्ण होणे आवश्यक आहे. सदर परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांची सीईटी घेण्यात येते. यानंतर शिक्षक भरती अंतर्गत शिक्षक नियुक्तीचा मार्ग मोकळा होतो. यामुळे डीएड-बीएड धारकांकडून टीईटीची प्रतीक्षा करण्यात येत होती. मार्च महिन्यात टीईटी होणार होती. मात्र कोरोना संकटात परीक्षा लांबणीवर पडत गेली. सातत्याने तीन ते चारवेळा तारीख पे तारीख देण्यात आली. अखेर 6 महिने विलंबाने परीक्षा घेण्यात येणार आहे.
बेळगाव शैक्षणिक जिल्हय़ातून 7 हजार 120 विद्यार्थी परीक्षा देणार असून पहिल्या पेपरसाठी 3 हजार 394 परीक्षार्थी तर दुसऱया पेपरसाठी 6 हजार 819 परीक्षार्थींनी अर्ज केला आहे. सदर परीक्षेत उत्तीर्ण झाल्याखेरीज सीईटीसाठी पात्र होता येत नाही. यामुळे डीएड-बीएडधारकांसाठी टीईटी जणू सत्वपरीक्षाच आहे. कोरोनाच्या संकटछायेत त्रिसुत्रीची अंमलबजावणी करत परीक्षा घेण्यात येणार आहे. पहिला पेपर सकाळी 9.30 ते 12 यावेळेत होणार असून दुसरा पेपर दुपारी 2 ते 4.30 यावेळेत होणार आहे. कोरोना संकटात परीक्षेसाठी इतर परजिल्हय़ांतील विद्यार्थ्यांना संबंधित जिल्हय़ातच परीक्षा केंद्रांची व्यवस्था करण्यात आली आहे. यामुळे 1 केंद्र वाढविण्यात आले असल्याची माहिती शिक्षण विभागातर्फे देण्यात आली आहे.