प्रतिनिधी/ म्हसवड
दिवड (ता. माण) येथील किसन नारायण सावंत (वय 50) यांनी घरातील सुरु असलेला टि. व्ही. बंद केल्याच्या कारणावरुन त्यांची पत्नी उषा किसन सावंत व मुलगा आदित्य किसन सावंत या दोघा मायलेकरानी मिळून रागाच्या भरात किसन सावंत यांना दांडक्याने डोक्यात, छातीवर, पाठीवर मारहाण केली. तसेच लाथा बुक्क्याही मारल्याची घटना 12 दिवसांपूर्वी घडली होती. मारहाणीत गंभीर जखमी झालेल्या किसन सावंत यांच्यावर पंढरपूर व सातारा जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू होते. उपचारादरम्यान 12 रोजी त्यांचा मृत्यू झाला. किसन सावंत यांच्या मृत्यूस कारणीभूत मायलेकरावर खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबतची तक्रार म्हसवड पोलिसात मयत किसन सावंत यांची बहिण सौ. विमल नंदकुमार भोसले (वय 52, रा.गोरेगाव निमसोड ता. खटाव) यांनी रविवारी रात्री उशिरा फिर्याद दिली होती. त्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर मृत किसन सावंत यांच्या पत्नी उषा किसन सावंत व मुलगा आदित्य किसन सावंत या मायलेकरांना म्हसवड पोलिसांनी अटक केली आहे.
याबाबत विमल भोसले यांनी म्हसवड पोलीस स्टेशनला दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे, माझा भाऊ दि. 1 नोव्हेंबर रोजी दुपारी 2 वाजून 30 मिनीटे यावेळेत घरातील टि. व्ही. सुरु होता तो किसन सावंत यांनी बंद केल्याच्या कारणावरुन फिर्यादीची भाऊजय सौ. उषा किसन सावंत, मोठा भाचा आदित्य किसन सावंत या दोघांनी आपआपसात संगनमत करुन घरातील दांडकी घेऊन त्यांच्या डोक्यात व संपुर्ण अंगावर तसेच त्यांच्या छातीवर, पोटावर लाथा बुक्यांनी मारुन असुन त्यास गंभीर जखमी करुन त्यांचा खून केला.
तक्रारदार व त्यांचे नातेवाईक यांनी दि. 1 नोव्हेंबर रोजी मारहाण केल्यानंतर जखमी अवस्थेत किसन सावंत यांना पंढरपूर येथे उपचारासाठी दाखल केले होते. त्यांनंतर त्यांना सातारा येथील सिव्हिल हॉस्पिटल सातारा येथे अधिक उपचारासाठी दाखल केले होते. शनिवार दि. 12 रोजी रात्री उशिरा किसन सावंत यांचा मृत्यू झाला. याबाबतची माहिती बहिण विमल भोसले यांना समजताच त्यांनी दि.13 रोजी रात्री उशिरा फिर्याद दिली. या फिर्यादीवरुन म्हसवड पोलिसांनी गुन्हा दाखल करत उषा सावंत, आदित्य सावंत या मायलेकरांना अटक केली.
अधिक तपास उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश केंद्रे यांनी भेट देऊन तपासासंबधी सूचना म्हसवड पोलीस ठाण्याचे सपोनि राजकुमार भुजबळ यांना दिल्या असून अधिकारी तपास म्हसवड पोलीस करत आहेत.