ऑनलाईन टीम / मुंबई :
टी-सीरिजचा मालक आणि सुप्रसिद्ध निर्माता भूषण कुमार यांच्यावर एका मुलीने बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे. मुलीच्या तक्रारीनंतर डीएन नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, टी-सीरिजच्या प्रोजेक्टमध्ये काम करण्याचे आमिष दाखवून भूषण कुमारने तिच्यावर बलात्कार केल्याचा आरोप एका 30 वर्षीय मुलीने केला आहे. भूषण कुमार टी-सीरिजचे संस्थापक गुलशन कुमार यांचा मुलगा आहे. अभिनेत्री आणि निर्माता दिव्या खोसला कुमार यांचे ते पती आहेत.
भूषणवर बलात्काराचा गंभीर आरोप करणार्या मुलीने पोलिसांकडे दिलेल्या तक्रारीत दावा केला आहे की, काम देण्याच्या नावाखाली भूषण कुमारने 2017 ते ऑगस्ट 2020 या कालावधीत तीन वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन तिच्यावर बलात्कार केला. इतकेच नाही तर मुलीने आपल्या तक्रारीत म्हटले आहे की, जर ती त्याच्या विरोधात गेली तर तिचे व्हिडिओ आणि फोटो लीक केले जातील, अशी धमकी देखील भूषण कुमारने तिला दिली आहे.
दरम्यान, वडील गुलशन कुमार यांच्या हत्येनंतर काका कृष्णा कुमार यांच्यासमवेत भूषण कुमारने टी-सीरिजची जबाबदारी सांभाळली. 2001 मध्ये भूषण कुमारने ‘तुम बिन’ सिनेमाद्वारे निर्माता म्हणून काम सुरू केले. यानंतर त्याने आपल्या प्रोडक्शन हाऊसमधून एकामागून एक अनेक हिट फिल्म्स दिल्या आहेत. यामध्ये ‘भूलभुल्लैया’ ते ‘आशिकी २’, ‘बादशाहो’ ते ‘तुम्हारी सुलु’, ‘भारत’ ‘सत्यमेव जयते’ या सिनेमांचा समावेश आहे.