द.आफ्रिकेचा क्विन्टॉन डी कॉक प्रथमच टॉप टेनमध्ये
वृत्तसंस्था/ दुबई
आयसीसीने जाहीर केलेल्या टी-20 ताज्या मानांकनात दक्षिण आफ्रिकेचा यष्टिरक्षक-फलंदाज क्विन्टॉन डी कॉकने चार स्थानांची प्रगती करीत कारकिर्दीतील सर्वोत्तम आठव्या स्थानावर झेप घेतली आहे. लंकेविरुद्धच्या मालिकेत चांगले प्रदर्शन केल्याचा त्याला फायदा झाला. कोहली चौथ्या, केएल राहुल सहाव्या स्थानावर आहे.
द.आफ्रिकेने या मालिकेत लंकेवर 3-0 अशी एकतर्फी मात केली. डी कॉकने सर्वाधिक 153 धावा जमविल्या. त्यात शेवटच्या सामन्यातील 46 चेंडूतील नाबाद 59 धावांचाही समावेश आहे. द.आफ्रिकेने हा सामना 10 गडय़ांनी जिंकला. टी-20 मानांकनात तो पहिल्यांदाच टॉप टेनमध्ये दाखल झाला आहे. मात्र वनडेमध्ये तिसऱया व कसोटीमध्ये सहाव्या स्थानापर्यंत त्याने यापूर्वी मजल मारली होती. टी-20 मध्ये भारतीय कर्णधार विराट कोहलीने चौथ्या स्थानावर मजल मारली आहे तर केएल राहुलने सहावे स्थान कायम राखले आहे. या मानांकनात प्रगती करणारा मार्करम हा द.आफ्रिकेचा आणखी एक खेळाडू आहे. त्याने 12 स्थानांची प्रगती करीत 11 व्या तर बियॉर्न फॉर्च्युनने 103 स्थानांची प्रगती करीत 43 व्या स्थानावर झेप घेतली आहे. याशिवाय गोलंदाजीत द.आफ्रिकेच्या ऍन्रिच नॉर्त्जेने 29 स्थानांची बढत मिळवित 71 व्या स्थानावर मजल मारली आहे. लंकेच्या कुसल परेराने फलंदाजीत दहा स्थानांची बढती मिळवित 38 व्या स्थानावर मजल मारली आहे. त्याने दोन डावात 69 धावा जमविल्या.
बांगलादेशचा वेगवान गोलंदाज मुस्तफिजुर रेहमान दोन क्रमाने पुढे सरकला असून त्याने आता आठवे स्थान मिळविले आहे. न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेत त्याने आठ बळी मिळविले, त्याचा त्याला मानांकनात लाभ झाला. नासुम अहमद (15 वे), मेहेदी हसन (20 वे) यांनीही प्रगती केली आहे. अष्टपैलूंमध्ये मात्र बांगलादेशच्या शकीब अल हसनने अग्रस्थान गमविले असून अफगाणच्या मोहम्मद नबीने त्याचे स्थान पटकावले आहे. न्यूझीलंडच्या टॉम लॅथमने 22 स्थानांची प्रगती करीत 44 आणि फिन ऍलेनने 23 स्थानांची बढत मिळवित 66 वे स्थान मिळविले आहे. शेवटच्या सामन्यात लॅथमने नाबाद 50 तर ऍलेनने 41 धावा केल्या होत्या.
वनडे मानांकनातील फलंदाजांत आयर्लंडचा विल्यम्स पोर्टरफील्ड (66 वे), झिम्बाब्वेचा पेग एर्विन (72 वे), अमेरिकेचा जसकरण मल्होत्रा (तब्बल 169 स्थानांची प्रगती करीत 132 वे स्थान) यांनीही प्रगती केली आहे. यातील जसकरण मल्होत्राने पापुआ न्यू गिनियाविरुद्धच्या वर्ल्ड सुपरलीग 2 सामन्यात एका षटकात 6 षटकार ठोकण्याचा पराक्रम केला. गोलंदाजांत आयर्लंडचे अँडी मॅकब्राईन (27 वे), सिमी सिंग (38 वे) तसेच नेपाळचा संदीप लामिछने (91 वे), पीपीजीचा चार्लस अमिनी (96 वे) यांनीही क्रमवारीत प्रगती केली आहे.