वृत्तसंस्था/ इंडियन वेल्स
कोरोना महामारीमुळे आंतरराष्ट्रीय टेनिस फेडरेशनने एटीपी आणि डब्ल्यूटीए टूरवरील अनुक्रमे पुरुष आणि महिलांच्या सर्व आंतरराष्ट्रीय स्पर्धा त्याचप्रमाणे ग्रॅण्डस्लॅम स्पर्धा लांबणीवर टाकण्याचा निर्णय घेतला आहे. 2020 चा टेनिस हंगाम जवळपास संपुष्टात आल्यात जमा आहे. त्यामुळे आगामी टेनिस हंगाम पुढील मार्चपासून इंडियाना वेल्समधील स्पर्धेने सुरू होईल, असे आयोजकांनी सांगितले आहे.
2020 च्या टेनिस हंगामातील बऱयाच आंतरराष्ट्रीय स्तरावरील टेनिस स्पर्धा रद्द कराव्या लागल्या आहेत. ऑस्टेलियातील ग्रॅण्डस्लॅम स्पर्धा संपल्यानंतर कोरोना व्हायरसने संपूर्ण जगात भीतीचे वातावरण निर्माण केले. चीन, अमेरिका, इटली, स्पेन, फ्रान्स, बेल्जियम, ब्राझिल, कोरिया या युरोपियन देशांना कोरोना महामारीने चांगलेच दमविले आहे. आता जर्मनी आणि रशियातही या महामारीचा प्रसार झपाटय़ाने वाढत असल्याचे चित्र दिसून येते. कोरोना महामारीचे सावट संपूर्ण जगावर पडले असून आर्थिक संकटाला सर्वच देशांना तोंड द्यावे लागत आहे. या महामारीत लाखो लोकांचे बळी पडतील, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. आतापर्यंत कोरोनाचे जागतिक स्तरावर सुमारे 2 लाख बळी पडले आहेत. तर लाखो लोकांना याची बाधा झाली आहे. व्यावसायिक टेनिस स्पर्धा गेल्या मार्चपासून तहकूब करण्यात आल्या आहेत. तर एटीपी आणि डब्ल्यूटीए टूरवरील इंडियन वेल्स टेनिस स्पर्धा रद्द करण्याचा निर्णय स्पर्धा आयोजकांनी घेतला आहे. विम्बल्डन टेनिस स्पर्धा यापूर्वीच रद्द करण्यात आली असून प्रेंच ग्रॅण्डस्लॅम टेनिस स्पर्धा सप्टेंबरपर्यंत लांबणीवर टाकण्यात आली आहे. प्रेंच आणि अमेरिकन ग्रॅण्डस्लॅम स्पर्धांमध्ये केवळ आता एक आठवडाचे अंतर बाकी ठेवण्यात आले आहे. 2020 अखेरीस कदाचित कोरोनाचा प्रभाव कमी होईल, अशी आशा व्यक्त केली जात आहे. 2020 मधील टोकिओ ऑलिम्पिक स्पर्धा एक वर्षासाठी लांबणीवर टाकण्याचा निर्णय यापूर्वीच घेण्यात आला आहे. जपानमध्ये कोरोना प्रसारावर नियंत्रण बऱयापैकी ठेवण्यात आले आहे.