वृत्तसंस्था/ टोकियो
2021 साली जपानमध्ये टोकियो ऑलिंपिक स्पर्धा भरविली जाणार आहे. या स्पर्धेसाठी टोकियोमध्ये आगमन झाल्यानंतर ऍथलीटस्ना 14 दिवसांच्या कालावधीकरिता आयसोलेशनमध्ये ठेवले जाणार नाही, असे स्पर्धा आयोजकांनी गुरूवारी जाहीर केले आहे. सदर स्पर्धा 2020 साली घेतली जाणार होती पण कोरोना महामारी समस्येमुळे ती एक वर्षांसाठी लांबणीवर टाकण्यात आली.
या स्पर्धेवेळी कोरोना संदर्भात सर्व काळजी स्पर्धा आयोजकांकडून घेतली जाणार आहे. जपानमध्ये कोरोनाचा प्रसार होवू नये यासाठी शासनाकडून सध्या विदेशीतून येणाऱया कोणत्याही व्यक्तीला 14 दिवसांच्या कालावधीकरिता आयसोलेशन सक्तीचे करण्यात आले आहे पण हा नियम विदेशातील ऑलिंपिक ऍथलीटस्ना शिथिल करण्यात आला आहे. जपानमध्ये प्रवेश करण्यापूर्वी 72 तासांच्या कालावधीत सदर ऍथलीटस्ची कोरोना चांचणी सक्तीची राहील, असे सांगण्यात आले पण कोणत्याही परिस्थितीत 14 दिवसांच्या कालावधीकरिता क्वारंटाईन अशक्य असल्याचे सांगण्यात आले. विदेशातून येणाऱया प्रेक्षकांसाठी अद्याप नियम करण्यात आलेला नाही.
विविध देशांचे ऍथलीटस्, प्रशिक्षक आणि क्रीडाधिकारी यांना टोकियो ऑलिंपिक स्पर्धेकरिता प्रवेशाला परवानगी दिली जाईल पण जपानमध्ये आल्यानंतर या विदेशी नागरिकांसाठी खास सुविधा उपलब्ध करून दिल्या जातील, असे टोकियो ऑलिंपिकचे पमुख कार्यकारी अधिकारी मुटो यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. टोकियो ऑलिंपिक स्पर्धासंदर्भात टोकियो मेट्रो पोलिटियन शासनाचे अधिकारी तसेच राष्ट्रीय शासनाचे अधिकारी आणि टोकियो ऑलिंपिक स्पर्धा अधिकारी यांच्यात बैठक झाली. कोरोना परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतरच पुढीलवर्षी विदेशी शौकिनांना जपानमध्ये प्रवेश देण्याबाबत निर्णय घेतला जाईल, असेही मुटो यांनी सांगितले.
पुढील आठवडय़ात आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक समितीचे प्रमुख थॉमस बॅच तीन दिवसांसाठी जपानच्या दौऱयावर येणार आहेत. बॅच या भेटीमध्ये टोकियो ऑलिंपिक स्पर्धा आयोजकांशी विविध समस्यांवर चर्चा करणार आहेत. बॅच यांचे 15 ते 18 नोव्हेंबर दरम्यान जपानमध्ये वास्तव्य राहणार असून ते जपानचे पंतप्रधान सुगा यांची भेट घेणार आहेत.