कोणकेरी नजीक घटना : मुलांची हौस बेतली जीवावर
प्रतिनिधी/ संकेश्वर
भरधाव टॅक्टर रस्त्याकडेच्या सखल भागात उलटला. या अपघातात ट्रक्टर चालकाच्या मुलाचा बळी गेल्याने कोणकेरी भागात हळहळ व्यक्त केली जात आहे. या अपघाताची नोंद संकेश्वर पोलिसात झाली आहे.
या घटनेबाबत समजलेली माहिती अशी की, बुधवारी सायंकाळी डिझेल भरण्यासाठी हा ट्रक्टर गावानजीकच्या पेट्रोलपंपावर आला होता. डिझेल भरुन तो पुन्हा घरी निघाला असतानाच चालकाचे वेगावरील नियंत्रण सुटल्याने रस्त्याकडेला असणाऱया सखलभागात ट्रक्टर अचानक उलटला. या ट्रक्टरमध्ये बसलेला चालकाचा शाळकरी मुलगाच ट्रक्टरखाली चिरडला गेल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला.
दिवाळी पाडव्याच्या शुभमुहूर्तावर हा ट्रक्टर खरेदी करण्यात आला होता. हौसेला मोल नाही असे म्हणतात. तशीच काहीशी वेळ आली होती. त्यामुळे डिझेल भरण्यासाठी मीही येणार हा हट्ट त्या मुलाने धरल्यामुळे त्यासही सोबत घेऊन त्याचे वडील गेले होते. पण मुलाचा तो हट्टच त्याच्या जीवनाचा अखेर ठरुन राहिला. या घटनेची नोंद संकेश्वर पोलिसात झाली आहे.