प्रतिनिधी / कोल्हापूर
इस्पूर्ली परिसरात ट्रक्टर, ट्रॉलीची चोरी करणाऱया तीघांना स्थानिक गुन्हे अन्वेषणने जेरबंद केले. त्यांच्याकडून पोलीसांनी चार ट्रक्टर, दोन ट्रॉली असा सुमारे 10 लाख रुपयांचा मुद्देमाल पोलीसांनी जप्त केला. निलेश बाजीराव पाटील ( वय 32 रा. वाकरे ता. करवीर ), सतिश विठ्ठल पाटील (वय 25) मनोज विठ्ठल पाटील (वय 19 दोघेही रा. केंबळी ता. कागल, जि. कोल्हापूर ) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. त्यांच्याकडून चोरीची आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, निलेश पाटील याची वाकरे येथे वीट भट्टी आहे. या विट भट्टीवर चोरीचे ट्रक्टर व ट्रॉली विटेची वाहतूक करण्यासाठी वापरात असल्याची माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषणचे पोलीस निरीक्षक तानाजी सावंत यांना मिळाली होती. यानुसार या वीट भट्टीवर गेल्या दोन महिन्यांपासून पोलीसांनी लक्ष केंद्रित केले होते. रविवारी सायंकाळी वीट भट्टीवरुन निलेश पाटील, सतिश पाटील, मनोज पाटील यांना ताब्यात घेवून त्यांच्याकडे चौकशी केली असता त्यांनी इस्पूर्ली परिसरातून दोन ट्रक्टर व 2 ट्रॉली चोरल्याचे कबूल केले. त्यांना अटक करुन चार ट्रक्टर व दोन ट्रॉली असा सुमारे 9 लाख 72 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
पोलीस निरीक्षक तानाजी सावंत यांच्यामार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष पवार, सत्यजित घुले, इकबाल महात, सचिन देसाई, सुरेश पाटील, असिफ कलायगार, रणजित पाटील, विलास किरोळकर, नामदेव यादव, रणजीत कांबळे, अजय काळे, अजय सावंत, अमर वासुदेव यांनी ही कारवाई केली.
ट्रक्टर एक ट्रॉली वेगळी
निलेश पाटील याच्या वीट भट्टीवर तसेच उस तोडणीसाठी हे तीघे चोरीचे ट्रक्टर वापरत असल्याचे समोर आले आहे. निलेश, सतिश, मनोज हे पहिल्यांदाच पोलीस रेकॉर्डवर आले आहेत. ट्रक्टर एक तर ट्रॉली चोरीची असे करुन हे तीघे टॅक्टर, ट्रॉली कामासाठी वापरत होते.