दाडाचीवाडी धारगळ येथील घटना, काशीमभाट – वझरी गावावर शोककळा
पेडणे (प्रतिनिधी )
दाडाचीवाडी धारगळ येथे मालवाहू ट्रक व दुचाकी यांच्यात शनिवारी सायंकाळी झालेल्या अपघातात काशीमभाट वझरी येथील चेतन सुभाष परब (19) हा युवक जागीच ठार झाला. युवकाच्या अंगावरून ट्रक गेल्याने त्याचे शरीर व दुचाकीचा चेंदामेंदा झाला. शिवाय घटनास्थळी रक्ताचा सडा पडला होता. संतप्त नागरिकांनी ट्रक रोखून धरला आणि थोडय़ाप्रमाणात ट्रकचा दर्शनी भागाची तोडफोड केली. घटनास्थळी वेळीच पोलीस पोहचल्याने वातावरण शांत झाले.
सविस्तर माहितीनुसार, चेतन संतोष परब हा धारगळ सुकेकुळणमार्गे वझरी पेडणे येथे जात होता. तर ट्रक क्र. एम. एच 46 बी. यु 0697 घेऊन शिवेंद्रकुमार यादव (मध्यप्रदेश) हा विरुद्ध दिशेने येत होता. दाडाचीवाडी धारगळ येथे दोन्ही गाडय़ांची धडक बसली. या धडकेत दुचाकी ट्रकच्या समोरच्या चाकात अडकली. ट्रकने चेतन व दुचाकीला दहा मीटरपर्यंत फरफटत नेले. ट्रक चेतनच्यावरुन गेल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. शिवाय दुचाकी चेंदामेंदा झाल्याचे चित्र घटनास्थळी दिसले. अपघाताची माहिती कळताच नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली आणि अपघाताला कारणीभूत ठरलेल्या ट्रकवर संतप्त नागरिकांनी आपला राग काढला. ट्रकची थोडय़ा प्रमाणात तोडफोड करण्यात आली.
चेतन परब हा मोपा विमानतळावर हल्लीच कामाला लागला होता. काल तो रजा घेऊन गाडी सर्व्हिसिंग करुन घरी जात होता. दाडाचीवाडी धारगळ येथे पोहचला असता त्याला ट्रकने उडवले. चेतनचे वडील वाहन चालवून उदरनिर्वाह करतात. चेतनला आई-वडील आणि लहान बहीण आहे. या घटनेची माहिती वझरी गावाला मिळताच गावात शोककळा पसरली. एक मनमिळावू स्वभावाचा युवक म्हणून तो वाडय़ावर परिचित होता.
अपघातास कारणीभूत ठरलेला शिवेंद्रकुमार यादव मध्यप्रदेश येथील मोपा विमानतळ प्रकल्पावर कामासाठी वापरण्यात येत असलेल्या मालवाहू चालकाला पेडणे पोलिसांनी अटक करत त्याच्यावर गुन्हा नोंद केला. पेडणे पोलिसांनी अपघाताचा पंचनामा करुन मृतदेह शवचिकित्सेसाठी गोवा वैद्यकीय महाविद्यालय इस्पितळात पाठविला.