खनिज माल वाहतूकीवरून कंपनी, ट्रकमालकांमध्ये संघर्ष
प्रतिनिधी/ धारबांदोडा
शिगांव-कुळे येथील फोमेन्तो खाण कंपनीच्या खनिज मालाची वाहतूक करण्यात शिगांव ट्रक मालक संघटनेने विरोध केला आहे. पंपनीच्या सी-कोड प्रमाणे वाहतूक करावी व कुळे शिगांव पंचायत क्षेत्रातील सुमारे पन्नास ट्रकांना त्या वाहतूकीमध्ये सामावून घ्यावे, अशी जोरदार मागणी ट्रक मालक संघटनेने केली आहे. मात्र ही मागणी कंपनीला मान्य नसल्याने कंपनी व ट्रक मालक संघटना यांच्यामध्ये संघर्ष निर्माण झाला आहे.
यावर रितसर तोडगा काढण्यासाठी काल शुक्रवारी धारबांदोडा उपजिल्हाधिकारी कार्यालयात ट्रक मालक संघटना, कुळे शिगांव पंचायत मंडळ व बांधकाम मंत्री दीपक पाऊसकर यांची संयुक्त बैठक पार पडली. मात्र शेवटपर्यंत वाहतुकीवर तोडगा निघाला नाही. ट्रक मालक व पंचायत मंडळाची भूमिका ऐकून घेतल्यानंतर बांधकाम मंत्री दीपक पाऊसकर व उपजिल्हाधिकारी प्रदीप नाईक यांनी दिली. सीकोड प्रमाणेच वाहतूक करावी, अशी शिफारस केली. तरीही कंपनीने या मागणीला नकार दिला आहे. जर कंपनी ही मागणी मान्य करण्यास तयार नसेल तर वाहतुकीला आपण परवानगी देऊ शकत नाही, असे स्पष्ट शब्दांत उपजिल्हाधिकाऱयांनी कंपनीला सुनावले.
बांधकामंत्र्यांची ट्रकमालकांबरोबर राहण्याची ठाम भूमिका
कंपनी सी कोड प्रमाणे वाहतूक करू शकत नसल्यास आपण ट्रक मालकांच्या विरोधात जाऊ शकत नसल्याचे दीपक पाऊसकर यांनी यावेळी स्पष्ट केले. शिगांव ट्रक मालक संघटनेचे अध्यक्ष शशिकांत वेळीप यांनी ट्रक मालकांची भूमिका मांडताना कंपनीने सी-कोड प्रमाणेच वाहतूक करावी, जर वाहतूकीस बाहेरील ट्रकांना सामावून घेतल्यास स्थानिकांवर तो अन्याय होणार असल्याचे सांगून, लाखो रुपये खर्च करून ट्रकमालकांनी ट्रक उभे केले आहे. कंपनीकडे केवळ 68 हजार मेट्रिक टन माल असून तो संपल्यानंतर ट्रक नसल्याचे सांगितले. यामुळे ट्रकमालकांवर आर्थिक संकट येणार असल्याचे ते म्हणाले.
धारबांदोडा तालुक्यातील सर्व खाण कंपन्यावर एसओपीप्रमाणे काम चालत असून फॉमेन्तो कंपनीलाच वेगळा कायदा का, असा सवाल नीलेश वेळीप यांनी उपस्थित केला. शिगांव येथील ट्रक मालकांना इतर खाण कंपन्यावर काम मिळत नाही. जर फॉमेन्तो कंपनीच्या वाहतुकीला सर्वानाच सामावून घेत असेल तर शिगांव ट्रक मालकांनाही सर्व कंपन्यामध्ये सामावून घेण्याची मागणी त्यांनी यावेळी केली.
सरपंच मनिष लांबोर यांनी यावर तोडगा काढण्यासाठी कंपनीने सी-कोड प्रमाणेच वाहतूक करावी, अशी मागणी केली. तसेच सी-कोडमध्ये समाविष्ट असलेले काही ट्रक विकण्यात आले आहेत. त्याजागी कुळे क्षेत्रातीलच सुमारे पन्नास ट्रकांना सामावून घेणे व शक्य असल्यास त्यानंतर इतर ट्रकांना सामावून घेण्याची पर्याय सूचविला. वाहतूकीसाठी नेंदणी केलेल्यापैकी काही ट्रक सदर (अधिकृत मार्ग) रूटच्या बाहेरचे असल्याचे निदर्शनास आणून दिले.
दरम्यान, उपजिल्हाधिकारी प्रदीप नाईक यांनी कंपनीची बाजू ऐकून घेतली. ज्या 429 वाहनांनी नोंदणी केली आहे ती वाहने शिगांव ते सावर्डे रूटच्या आहेत का? याची माहिती जाणून घेताना कंपनी अधिकारी राजकुमार शुक्ला यांनी सर्व ट्रक रूटचे आहेत, असा दावा केला असता पंचसदस्य मच्छींद्र देसाई यांनी हा दावा फेटाळून लावला व शहानिशा करण्याची मागणी केली.
या बैठकीला मामलेदार शमिला गावकर, कुळे पोलीस स्थानकाचे निरीक्षक प्रज्योत फडते, पंचसदस्य व ट्रकमालक उपस्थित होते. कोणत्याच तोडग्याविना बैठक आटोक्यात घेण्यात आली.
बजावलेल्या नोटिसी मागे घेणार
कुळे पोलीस नरमले
दरम्यान, खनिज वाहतुकीला अनुसरून कुळे पोलिसांतर्फे काही ट्रक मालकांना गुरुवारी नोटिसा बजावण्यात आल्या होत्या. त्यामुळे ट्रकमालकांमध्ये मोठया प्रमाणात नाराजी पसरली होती. यामुळे नाराज झालेल्या शिगांव ट्रक मालक संघटनेने गुरुवारी रात्री कुळे पोलीस स्थानकावर धडक दिली. यावेळी निरीक्षक प्रज्योत फडते यांच्यासोबत सरपंच व ट्रकमालक संघटनेच्या पदाधिकाऱयांसोबत बैठक झाली.यावेळी ट्रक मालकांनी नाराजी व्यक्त केली. यावेळी निरीक्षक प्रज्योत फडते यांनी तो एक प्रक्रियेचा भाग असून त्यामुळे कुणावरही अन्याय होणार नसल्याचे स्पष्ट केले व सदर नोटिसी मागे घेण्याचे मान्य केले. अशा प्रकारच्या नोटीसा आल्यानंतर घरातील मंडळीमध्ये भीतीचे वातावरण तयार होत असते, असे नीलेश वेळीप यांनी सांगितले.
जोपर्यंत ट्रक मालक संघटनेच्या मागणीप्रमाणे खनिज वाहतूक होत नाही तोपर्यंत खनिज वाहतूक होऊ देणार नाही, असा पवित्रा ट्रकमालकांनी घेतला आहे. सरपंच मनिष लांबोर, पंचसदस्य मच्छिंद्र देसाई, शशिकांत वेळीप यांनी आपल्या बाजू मांडल्या.