ऑनलाईन टीम / वॉशिंग्टन :
अमेरिकेत ट्रम्प प्रशासनाने परदेशी विद्यार्थ्यांच्या व्हिसावर निर्बंध आणले आहेत. ट्रम्प प्रशासनाच्या या व्हिसा धोरणाला अमेरिकेतील 17 राज्यांनी कोर्टात आव्हान दिले आहे.
जे परदेशी विद्यार्थी अमेरिकेत शिक्षणासाठी आले आहेत आणि त्यांचे ऑनलाईन अभ्यासक्रम सुरू झाले, असतील त्यांनी अमेरिकेत राहण्याची गरज नाही, असे म्हणत ट्रम्प प्रशासनाने या विद्यार्थ्यांच्या व्हिसावर निर्बंध आणले. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे हा निर्णय घेण्यात आला असला तरी हा निर्णय बेकायदेशीर आणि घाईत घेतलेला आहे, असे या राज्यांचे म्हणणे आहे.
या निर्णयाविरोधात कोलोराडो, मेरीलॅंड, मिचीगन, मिन्नेसोटा, नेवाडा, न्यूजर्सी, न्यू मेक्सिको, ओरेगॉन, पेन्सीलव्हॅनिया, ऱ्होड आयलंड, व्हर्जिनिया, व्हिस्कोनसिन यासह अन्य पाच राज्यांच्या राज्यांच्या सरकारी वकिलांनी मॅस्युच्युसेट्स जिल्हा न्यायालयात आव्हान याचिका दाखल केली आहे. ट्रम्प प्रशासनाने परदेशी विद्यार्थ्यांना देशाबाहेर काढण्यासाठी घेतलेला हा निर्णय क्रुरपणाचा आहे. परदेशी विद्यार्थ्यांमुळे राज्यांच्या अर्थव्यवस्थेलाही हातभार लागतो. त्यामुळे या निर्णयाची अंमलबजावणी थांबवण्यात यावी, अशी मागणी याचिकेत करण्यात आली आहे.