ट्रम्प यांचे खाते बंद केल्याने नरेंद्र मोदींना आघाडीचे स्थान
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
ट्विटरवरील फॉलोअर्समध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी डोनाल्ड ट्रम्प यांना मागे टाकले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आता ट्विटरवर जगातील सर्वाधिक फॉलोअर्स असलेले राजकारणी झाले आहेत. अमेरिकेतील कॅपिटल हिलमधील हिंसाचारानंतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्विटरने अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे खाते कायमचे बंद केले आहे, त्यानंतर पंतप्रधान मोदी फॉलोअर्सच्या शर्यतीत पुढे सरसावले आहेत. आता पंतप्रधान नरेंद्र मोदी हे ट्विटरवर सर्वाधिक फॉलोअर्स असलेले राजकारणी झाले आहेत.
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या वैयक्तिक ट्विटर खात्यावर 8 कोटी 87 लाख इतके फॉलोअर्स होते. त्यांच्यापाठोपाठ जगातील सक्रीय नेत्यांच्या यादीत भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी दुसऱया क्रमांकावर होते. भारतीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ट्विटरवर 6 कोटी 47 लाख लोक फॉलो करत आहेत. मात्र, ट्विटरने ट्रम्प यांचे खाते कायमस्वरुपी बंद केल्याने आता मोदी सक्रीय नेत्यांमधील लोकप्रिय राजकारणी ठरले आहेत. तथापि, अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांचे ट्विटरवर सर्वाधिक 12 कोटी 79 लाख फॉलोअर्स आहेत. मात्र ओबामा सध्या कोणत्याही पदावर नसल्यामुळे त्यांना सक्रीय राजकारणी मानले जाऊ शकत नाही.