प्रतिनिधी/ सातारा
सोमवारी सकाळी साताऱयातील महामार्गालगत असणाऱया ठक्कर सिटी येथे मागून येणाऱया चाक निसटलेल्या आराम बसने परप्रांतियांना उडवले. या अपघातात एक परप्रांतीय ठार झाला तर दुसरा जखमी झाला आहे. तर त्याच्यासोबत असणाऱया अन्य जण या अपघातातून सुखरुप बचावले आहेत.
याबाबत पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी, उब्रज येथून मनोजकुमार बहादूर भार्गव (वय 19 रा. मध्यप्रदेश), मुनसिफ खान (रा. मध्यप्रदेश) व त्यांचे दोन-तीन साथीदार ट्रकमधून पुण्याच्या दिशेने निघाले होते. मात्र काही करणास्तव ते साताऱयातील ठक्कर सिटीलगत असणाऱया महामार्गावर उतरले. या ट्रकच्या मागून आराम बस जेए 08 व्ही 5045 ही गोव्याकडून मुंबईकडे निघाली होती. इतक्यात बसचे मागील बाजुच्या चाकाचे नटबोट निघाले. आणि चाके निसटून ही बस या परप्रांतीयाच्या दिशेने आली. यातील मनोजकुमार भार्गव यांच्या अंगावरून ही बस गेल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. तर दुसरा मुनसिफ खान या अपघातात गंभीर जखमी झाला तर त्यांच्यासोबत असणारे बचावले. जखमी झालेल्या मुनसिफला जिल्हा शासकीय रूग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे. या अपघातानंतर याठिकाणी मोठी गर्दी झाली होती.