नवी दिल्ली / वृत्तसंस्था
माजी सलामीवीर डब्ल्यूव्ही रमण यांची भारतीय महिला संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदावरुन उचलबांगडी करणाऱया सल्लागार समिती व निवड समिती वादाच्या भोवऱयात सापडली आहे. यातील क्रिकेट सल्लागार समितीचे अध्यक्षपद मदनलाल यांच्याकडे तर निवड समितीचे अध्यक्षपद नीतू डेव्हिड यांच्याकडे आहे. या दोन्ही समितींनी महिला संघाच्या प्रशिक्षकपदासाठी डब्ल्यूव्ही रमण यांच्याऐवजी रमेश पोवार यांची शिफारस केली होती. रमण यांनी भारतीय महिला संघाला आयसीसी टी-20 विश्वचषक स्पर्धेत उपजेतेपदापर्यंत मजल मारुन दिली होती. शिवाय, सर्वोत्तम भारतीय प्रशिक्षकांपैकी एक असा त्यांचा लौकिक आहे. वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, रमण व नीतू हे दोघेही प्रतिक्रियेसाठी उपलब्ध झाले नाहीत.
‘मदनलाल यांनी 20 मार्च 2021 रोजी आपला 70 वा वाढदिवस साजरा केला. बीसीसीआयच्या नियमानुसार, 70 वर्षावरील व्यक्तीला कोणतेही महत्त्वाचे पद भूषवता येत नाही. त्यामुळे मदनलाल यांना सल्लागार समितीच्या बैठकीत हजर राहण्याची परवानगी का दिली गेली’, असा प्रश्न एका वरिष्ठ सदस्याने यावेळी उपस्थित केला. सल्लागार समितीच्या बैठकीतील सुलक्षणा नाईक यांची भूमिका देखील टीकेचे केंद्र बनली आहे. केवळ एका खराब सिरीजनंतर सुलक्षणा यांनी कोणत्याही परिस्थितीत रमण प्रशिक्षक होता कामा नयेत, अशीच भूमिका घेतली होती, असे एका सूत्राने वृत्तसंस्थेशी बोलताना नमूद केले. मुंबई क्रिकेट संघटनेचे सचिव संजय नाईक यांची सुलक्षणा या कनिष्ठ भगिनी होत.
दक्षिण आफ्रिका दौऱयात वनडेसाठी शेफाली वर्माला संधी दिली गेली नाही. तसेच अनुभवी जलद गोलंदाज शिखा पांडेला देखील वगळले गेले होते. या वादग्रस्त निवडीचा वादही आता पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. दक्षिण आफ्रिका दौऱयासाठी निवडीदरम्यान रमण व नीतू डेव्हिड यांच्यात वाद झाले होते का, याचीही चर्चा सुरु आहे. दुसरीकडे, रमण काही खेळाडूंच्या उत्तम योगदानाची अजिबात प्रशंसा करत नसत, अशीही कुजबूज आहे. यष्टीरक्षक नुझत परवीन हिला त्यांनी डेब्यू कॅप दिली, ते सर्वांसाठी आश्चर्याचे ठरले. भारतीय संघातर्फे परवीनने त्यापूर्वीच वनडे व टी-20 खेळले होते. त्यामुळे, याची त्यांना माहिती कशी नव्हती, हा प्रश्न उपस्थित केला गेला आहे.