बेळगाव : मूळचा बेळगाव व सध्या मुंबई येथे चित्रकलेचे शिक्षण घेणाऱया केल्वीन डायस या विद्यार्थ्याने रेखाटलेल्या सुवर्णपदक विजेत्या व ऑलिम्पिकपटू नीरज चोप्राच्या चित्राला राष्ट्रीय कला स्पर्धेत दुसरा क्रमांक मिळाला. इंडिया टुरिझम व बॅतीक्रम माडसो ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमाने ही स्पर्धा पार पडली. ‘पेंटिंग ऑफ टोकियो ऑलिम्पिक इंडियन प्लेयर विनर्स’ हा स्पर्धेचा विषय होता.
ऑलिम्पिकपटू व सुवर्ण पदक विजेता नीरज चोप्राचे चित्र त्याने रेखाटले. मूळचा शहापूर, जेड गल्ली येथील रहिवासी असून सध्या तो पनवेल येथे राहतो. सहाव्या इयत्तेपासून त्याला चित्रे काढण्याची आवड आहे. गिरीश घरत या रेखाचित्र शिक्षकांपासून त्याने प्रेरणा घेतली.
त्याच्या मते चित्रकलेचे स्वतःचे विश्व आहे. नीरजने केलेल्या अतुलनीय कामगिरीमुळे त्याचे चित्र रेखाटले, असे तो सांगतो. भारतातील संस्कृती आणि वैशिष्टय़े यांचे लॅन्डस्केप्स व पोर्ट्रेट्स रंगवायची असून निसर्ग हा आपला गुरू आहे, असे तो सांगतो. यापूर्वी केल्वीनने मुंबई येथे हिना भट्ट आर्ट आयोजित स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळविला. त्याला ऑनलाईन चित्रकला स्पर्धा, भित्तीपत्रक तयार करण्याची ऑनलाईन स्पर्धा तसेच कोशिश फौंडेशन आयोजित भित्तीचित्र स्पर्धा यामध्ये प्रथम क्रमांक मिळाले आहेत.