प्रतिनिधी /वास्को
वाहतुकमंत्री माविन गुदिन्हो यांनी सोमवारी आपल्या वाढदिनाच्या निमित्ताने टॅक्सी व्यवसायीकांना गोड बातमी दिली. टॅक्सीना मिटर बसवणे आता आणखी फायदेशीर ठरणार आहे. टॅक्सींना मिटर बसवण्यासाठी भरावयची रवकम आता पूर्वीपेक्षा निम्मी भरावी लागणार असून ही रक्कम वर्षभरात परत मिळणार आहे.
सोमवारी सकाळी नवेवाडे वास्कोतील आपल्या कार्यालयात वाढदिवस साजारा केल्यानंतर पत्रकारांशी बोलताना वाहतुकमंत्री माविन गुदिन्हो यांनी टॅक्सींना बसवण्यात येणाऱया मिटरबाबत सरकारचा नवीन व टॅक्सी व्यवसायीकांना दिलासा देणार नियम जाहीर केला. ते म्हणाले की, टॅक्सींना मिटर सक्ती करण्यात आल्यापासून हा मिटर बसवताना टॅक्सी व्यवसायीकांना प्रथम या मिटरसाठी अकरा हजार रूपये रक्कम सरकारकडे भरावी लागत होती. मात्र, सरकारकडून या रक्कमेपैकी अर्धी रक्कम तीन महिन्यांनी परत करणे व उर्वरीत रक्कम वर्षांच्या अखेरपर्यंत परत करणे असा नियम होता. मात्र, आता या नियमात अधिक सुधारणा करताना टॅक्सी व्यवसायीकांना मिटरसाठी केवळ अर्धीच रक्कम भरावी लागणार असून ही रक्कम सुध्दा वर्ष अखेरपर्यंत टॅक्सी व्यवसायीकांना परत करण्यात येणार आहे. मिटर बसवणाऱया सर्वानाच याचा फायदा होणार असून सर्वांनाच त्यांचे पैसे परत करण्यात येणार असल्याचे मंत्री माविन गुदिन्हो यांनी म्हटले आहे.
टॅक्सी व्यवसायीकांबद्दल तक्रारी वाढल्या होत्या. शासकीय कायदय़ांचा त्यांच्याकडून भंग होत असल्याचा आरोप होत होता. त्यामुळेच प्रवाशांना सुरक्षा मिळावी. त्यांच्या मनातील भिती दूर व्हावी म्हणून डिजीटल मिटर बसवण्यासाठी सक्ती करण्यात आलेली आहे. महामारीची समस्या ओळखून सरकारने टॅक्सी व्यवसायीकांचे विविध कर माफ केलेले आहेत. त्यांना आता मिटरही मोफत देत आहोत असे मंत्री माविन गुदिन्हो म्हणाले.
यावेळी मंत्री गुदिन्हो यांनी राज्य सरकारने उपलब्ध केलेल्या इलॅक्ट्रीकल बसगाडय़ांसंबंधीही माहिती दिली. ते म्हणाले की सध्या गोव्यात पन्नास बसगाडय़ा उपलब्ध झालेल्या असून सरकार अशा प्रकारच्या 250 बसगाडय़ा खरेदी करणार आहे. या बसगाडय़ांसाठी पावर चार्जिंग स्टेशन्स उभी करण्यासाठी प्रक्रिया सुरू झालेली असल्याची माहिती त्यांनी दिली.