मंत्री डॉ. सुधाकर यांचे प्रतिपादन : कोरोनाविरुद्धच्या लढय़ाला बळ
प्रतिनिधी / बेंगळूर
कोरोना संसर्गाविरुद्धच्या लढय़ात संरक्षण संशोधन आणि विकास संस्था (डीआरडीओ) आणि भारतीय विज्ञान व संशोधन संस्था (आयआयएससी) यांचे प्रयत्न कौतुकास्पद आहेत, असे प्रतिपादन आरोग्यमंत्री डॉ. के. सुधाकर यांनी केले आहे. आयआयएससी विकसित करीत असलेल्या सामान्य तापमानातही साठवून ठेवता येणारी लस आणि डीआरडीओने विकसित केलेल्या 2-डीजी औषध, ऑक्सिकेअर सिस्टममुळे कोरोनाविरुद्धच्या लढय़ाला आणखी बळ मिळाले आहे, असे ते म्हणाले.
बेंगळूरच्या तिप्पसंद्र येथे डीआरडीओच्या कॅम्पसला भेट दिल्यानंतर ते बोलत होते. डीआरडीओने विकसित केलेल्या 2-डीजी (2 डीयोक्सी डी ग्लुकोज) औषधामुळे कोरोनाविरुद्धच्या लढय़ात मोठी प्रगती होत आहे. या औषधामुळे कोविड रुग्णांच्या आरोग्यात वेगाने सुधारणा होत आहे. तसेच त्यांचे ऑक्सिजनवरील अवलंबित्व कमी होत आहे, असे ते म्हणाले.
बेंगळूर शहर विज्ञान आणि तंत्रज्ञानाची राजधानी असून येथे अनेक प्रतिष्ठित संस्था आहेत.कोरोनामुळे अनेकजण इस्पितळात दाखल होत असून त्यांना ऑक्सिजनची गरज भासत आहे. डीआरडीओ आणि आयआयएससीकडून होणाऱया संशोधनामुळे कोरोनाबाधितांना साहाय्य होणार आहे, असे ते म्हणाले.
डीआरडीओच्या ऑक्सिजन प्लांटला भेट दिलेल्या आरोग्यमंत्री डॉ. सुधाकर यांना तेथील संशोधकांनी माहिती दिली. डीआरडीओचे इन्स्टिटय़ूट ऑफ न्युक्लियर मेडिसिन ऍन्ड अलाईड सायन्सस लॅब आणि डॉ. रेड्डीज लॅबच्या सहकार्याने तयार केलेल्या औषधांमुळे कोरोना रुग्ण लवकर बरा होण्यास मदत होणार आहे. तातडीच्या प्रसंगी रुग्णांना हे औषध देण्यास परवानगी मिळाली असून सकारात्मक परिणामही दिसून आले असल्याची माहिती संशोधकांनी दिली आहे.
ऑक्सिकेअर सिस्टम प्रभावी…
रुग्णांना पुरवठा करण्यात येणारे ऑक्सिजनचे प्रमाण नियंत्रित करण्यासाठी डीआरडीओने ऑक्सिकेअर सिस्टम तयार केले आहे. यामुळे रुग्णांना किती प्रमाणात ऑक्सिजन पुरवावे, हे निश्चित करता येणार आहे. या उपकरण केवळ इस्पितळांमध्येच नव्हे, तर कोविड केअर सेंटरमध्येही वापरता येणार आहे. पीएम केअर फंडातून 322 कोटी रुपये खर्चातून 1.5 लाख ऑक्सिकेअर सिस्टम खरेदी करण्यात येत आहे, अशी माहितही संशोधकांनी आरोग्यमंत्री डॉ. सुधाकर यांना दिली आहे.