चेन्नई : आयपीएल स्पर्धेसाठी भारताला रवाना होण्यापूर्वी नेटस्मध्ये सराव सुरु होता……फलंदाजीला होता दक्षिण आफ्रिकेचा माजी कर्णधार एबी डीव्हिलियर्स….त्याने आपल्या नेहमीच्या शैलीत काही फटके घोटवण्यास सुरुवात केली……कव्हर ड्राईव्ह….पूल…. फ्लिक…..लेटकट….अशी फटक्यांची बेगमी सुरु होती. एक चेंडू अगदी त्याच्या टप्प्यात आला….त्याने त्यावर तितक्याच चपळतेने स्ट्रेट ड्राईव्हचा नजाकतदार फटका लगावला. पण, इथे भलतेच घडले….कारण, ज्या आयफोनवर या सरावाचे चित्रीकरण सुरु होते, त्याच आयफोनवर डीव्हिलियर्सने स्ट्रेट ड्राईव्ह लगावल्यानंतर चेंडू जाऊन जोरात आदळला आणि आयफोनच्या स्क्रीनचा चक्काचूर झाला….दस्तुरखुद्द डीव्हिलियर्सनेच इन्स्टाग्रामवर याची माहिती दिली, या घटनेचा व्हीडिओ पोस्ट केला आणि यात तो म्हणाला, ‘आयफोन आऊट’!
आगामी आयपीएल स्पर्धेसाठी डीव्हिलियर्स सराव करत असून त्यावेळी ही घटना घडली. यंदाची आयपीएल स्पर्धा दि. 9 एप्रिलपासून खेळवली जाणार असून प्राथमिक सरावाचा टप्पा पूर्ण केल्यानंतर डीव्हिलियर्स भारतात येईल व आयपीएल प्रँचायझी रॉयल चॅलेंजर्स बेंगळूर संघात दाखल होणार आहे.
एबीडीने इन्स्टाग्रामवर हा व्हीडिओ पोस्ट केल्यानंतर तासाभरातच 83 हजारपेक्षा अधिक चाहत्यांनी तो पाहिला व लाईक केला होता. 360 अंशात फटके खेळण्यासाठी ओळखल्या जाणाऱया एबी डीव्हिलियर्सने आतापर्यंत खेळलेल्या 156 आयपीएल डावात 4849 धावांची बरसात केली असून त्याचा स्ट्राईक रेट 151.91 इतका राहिला आहे. आरसीबीने यंदाच्या हंगामासाठी ऑस्ट्रेलियन अष्टपैलू ग्लेन मॅक्सवेलला 14.25 कोटी रुपये किंमतीला करारबद्ध केले. शिवाय, डॅन ख्रिस्तियन व काईल जेमिसन या खेळाडूंनाही संघात घेतले आहे.
मागील हंगामात ते प्ले-ऑफमध्ये पोहोचले. पण, नंतर त्यांना अंतिम फेरीत स्थाननिश्चिती करता आली नव्हती.