कुलपती डॉ. संजय डी. पाटील मेडिकल कॉलेजचे ३३ व्या वर्षात पदार्पण
कसबा बावडा / प्रतिनिधी
दर्जेदार वैद्यकीय शिक्षणसाठी देशभर नावाजल्या जाणाऱ्या कोल्हापूर येथील डी. वाय पाटील वैद्यकीय महाविद्यालयाने ३२ वर्षांची यशस्वी वाटचाल करत ३३ व्या वर्षात पदार्पण केले आहे. आरोग्यसेवा मजबूत करणाऱ्या सक्षम डॉक्टरांच्या पिढ्या घडवणाऱ्या या महाविद्यालयाच्या पायाभूत सुविधांच्या विकास व विस्तारावर अधिक भर दिला जाईल. येत्या काही वर्षांमध्ये महाविद्यालयाची सुसज्ज नवी इमारत उभी राहणार असून दर्जेदार वैद्यकीय शिक्षणासाठी हे महाविद्यालय कटीबद्ध असल्याची ग्वाही डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाचे कुलपती डॉ. संजय डी. पाटील यांनी दिली.
डी. वाय पाटील वैद्यकीय महाविद्यालयाचा ३२ वा वर्धापन दिन गुरुवारी हॉटेल सयाजी येथे विशेष समारंभात साजरा करण्यात आला. डी. वाय. पाटील शिक्षण संस्थेचे अध्यक्ष डॉ. संजय डी. पाटील, विश्वस्त आमदार ऋतुराज पाटील, विश्वस्त पृथ्वीराज पाटील, आमदार जयंत असगावकर, कुलगुरू डॉ. राकेश कुमार मुदगल, प्र-कुलगुरू डॉ. शिंपा शर्मा, तळसंदे येथील डी. वाय. पाटील अॅग्रीकल्चर अँड टेक्निकल युनिव्हर्सिटीचे कुलगुरू डॉ. के. प्रथापन यांच्या हस्ते दीपप्रज्वलन झाले. डी. वाय पाटील वैद्यकीय महाविद्यालयाचा ३२ वर्षांचा प्रवास उलगडणारा माहितीपट यावेळी प्रदर्शित करण्यात आला.