लांजा-मधली कुंभारवाडीतील घटना
प्रतिनिधी/ लांजा
शहरातील मधली कुंभारवाडी येथे लोकवस्तीत रानटी डुमकरांच्या शिकारीसाठी लावलेल्या तारेच्या फासकीत अडकून बिबटय़ाचा मृत्यू ओढवल्याची घटना मंगळवारी सकाळी उघडकीस आली. वहाळातील एका झाडाला लावलेल्या फासकीत अडकून मृत अवस्थेतील बिबटय़ा एका गुराख्याच्या निदर्शनास आला.
जिल्हाभरात सध्या बिबटय़ांची दहशत आहे. अलिकडे रत्नागिरी, संगमेश्वर, लांजा, राजापूर या तालुक्यामधून बिबटय़ाच्या हल्ल्याच्या घटना वाढत आहेत. लांजा तालुक्याच्या ग्रामीण भागासह शहरातही बिबटय़ाने आपली दहशत माजवली आहे. दरम्यान मंगळवारी शहरातील कुंभारवाडी येथे लोकवस्तीपासून जवळ असलेल्या वहाळातील झाडाला लावलेल्या फासकीत अडकून मृत अवस्थेतील बिबटय़ा आढळून आला. सकाळी 6.30 च्या दरम्यान कुंभारवाडी येथील गुराख्याच्या ही बाब निदर्शनास आली. त्माहिती मिळताच वनविभागाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. यानंतर फासकीत अडकलेल्या बिबटय़ाला बाहेर काढण्यात आले. पंचनामा करण्यात आला असता बिबटय़ाचे सर्व अवयव सुरक्षित होते. येथील नागरिक पुरुषोत्तम आत्माराम कुंभार यांच्या मालकीच्या जागेत अज्ञाताने ही फासकी लावली होती.
लोकवस्तीशेजारी जंगल भागात व वहाळात रानटी प्राणी रात्री पाणी पिण्यासाठी येतात. हे पाहून अज्ञाताने तारेची फासकी लावली असावी. बिबटय़ाच्या मानेभोवती तारेचा फास अडकला होता. फासकीतून सुटका करण्यासाठी जोरदार प्रयत्न केल्याने मानेचा फास आवळला गेल्याने बिबटय़ाच्या मृत्यू झाल्याचा अंदाज व्यक्त होत आहे. 3 वर्षाच्या या मृत मादी बिबटय़ाची लांबी 210 सेंटीमीटर होती. रत्नागिरी-झाडगाव येथे शवविच्छेदनानंतर त्याच ठिकाणी बिबटय़ावर अंत्यसंस्कार केले जाणार असल्याचे वनविभागाकडून सांगण्यात आले. घटनास्थळी रत्नागिरी-लांजा वनपरिक्षेत्र अधिकारी प्रियांका लगड, लांजा वनपाल सागर पताडे, वनरक्षक विक्रम कुंभार आदी उपस्थित होते.