वार्ताहर / बांदा:
24 ते 31 मार्च दरम्यान आयोजित करण्यात आलेल्या ‘डेरवण युथ गेम्स 2021’ मध्ये सिंधुदुर्गाच्या नेमबाजांनी चमकदार कामगिरी करत तीन सुवर्ण आणि एक कास्यपदक पटकाविले.
ही स्पर्धा दहा मीटर ओपनसाईट, दहा मीटर पीपसाईट व दहा मीटर एअर पिस्तूल प्रकारात घेण्यात आली. 17 वर्षे वयोगटात साईश दिगंबर तळणकर, सावंतवाडी याने एअर पिस्तूल प्रकारात 400 पैकी 362 गुण मिळवित सुवर्ण पदक पटकाविले. तसेच 14 वर्षे वयोगटात आयुष दत्तप्रसाद पाटणकर, सावंतवाडी याने 400 पैकी 342 गुणांची नोंद करत सुवर्णपदक मिळविले.
सानिया सुदेश आंगचेकर, वेंगुर्ले हिने 17 वर्षे वयोगटात ओपन साईट क्रीडा प्रकारात 400 पैकी 315 गुण मिळवत सुवर्णपदक मिळविले. याच वयोगटात पीप साईट प्रकारात वैष्णवी गोविंद भांगले, बांदा हिने 400 पैकी 377 गुणांची नोंद करत कास्यपदक पटकाविले. सर्व खेळाडू सावंतवाडी, वेंगुर्ले व बांदा येथील उपरकर शूटिंग अकॅडमीत सराव करत असून त्यांना प्रशिक्षक कांचन उपरकर यांचे मार्गदर्शन लाभले.