वृत्तसंस्था/ ब्युनोस आयरीस
एटीपी टूरवरील येथे सुरू असलेल्या 500 दर्जाच्या अर्जेंटिना खुल्या पुरूषांच्या टेनिस स्पर्धेत नॉर्वेचा डेल्बोनिसने इटलीच्या फॉगनेनीचा पराभव करत उपांत्य फेरी गाठली आहे. त्याचप्रमाणे टॉप सीडेड कास्पर रूड, सोनेगो यांनी उपांत्य फेरीत प्रवेश मिळविला आहे.
उपांत्यपूर्व सामन्यात शुक्रवारी फेड्रिको डेलबोनीसने चौथ्या मानांकित फॉगनेनीवर 6-4, 6-4 अशा सेट्समध्ये मात करत शेवटच्या चार खेळाडूंत स्थान मिळविले. डेलबोनीस आता एटीपी टूरवरील तिसरे विजेतेपद मिळविण्यासाठी सज्ज झाला आहे. त्याने यापूर्वी 2014 साली साओ पावलो तर 2018 साली मॅरेर्केच येथील एटीपी स्पर्धा जिंकल्या होत्या. डेल्बोनिसने 95 मिनिटांच्या कालावधीत फॉगनेनीचा पराभव केला. आता डेल्बोनिस आणि कास्पर रूड यांच्यात उपांत्य फेरीचा सामना होईल.
उपांत्यपूर्व फेरीच्या अन्य एका सामन्यात तृतीय मानांकित लोरेझो सोनेगोने स्पेनच्या व्हर्डेस्कोवर 6-4, 7-6 (7-4) अशी मात करत उपांत्य फेरी गाठली आहे. इटलीचा 26 वर्षीय सोनेगोचा उपांत्य सामना अर्जेंटिनाच्या श्वार्त्झमन आणि सेरूनडोलो यांच्यातील विजयी खेळाडूबरोबर होणार आहे. श्वार्त्झमन आणि सेरूनडोलो यांच्यातील उपांत्यपूर्व फेरीचा सामना 6-2, 1-1 अशा स्थितीमध्ये पावसामुळे थांबविण्यात आला होता. तो शनिवारी पुढे खेळविला जाईल.