वृत्तसंस्था/ लंडन
2021 च्या डेव्हिस चषक टेनिस स्पर्धेच्या अंतिम फेरीसाठी यापूर्वी सात दिवसांचा कालावधी निश्चित करण्यात आला होता पण आता या निर्णयामध्ये बदल करण्यात आला असून आता या स्पर्धेच्या अंतिम फेरीसाठी 11 दिवसांचा कालावधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. या अंतिम फेरीतील सामने तीन शहरामध्ये खेळविले जातील, अशी माहिती आंतरराष्ट्रीय टेनिस फेडरेशनच्या प्रवक्त्याने दिली आहे. आंतरराष्ट्रीय टेनिस फेडरेशनच्या डेव्हिस चषक टेनिस स्पर्धेच्या कार्यक्रमामध्ये फेरबदल करण्याची शिफारस या स्पर्धेचे पार्टनर कॉसमॉस टेनिसतर्फे करण्यात आली. स्पेनच्या कॉसमॉस टेनिस स्पर्धेत 25 वर्षांच्या कालावधीसाठी या स्पर्धेकरिता सुमारे तीन अब्ज डॉलर्सची गुंतवणूक करण्याचे ठरल्याने त्यांच्या या शिफारशीला आयटीएफच्या मंडळाने मान्यता दिली आहे. 2021 ची डेव्हिस चषक टेनिस स्पर्धा 25 नोव्हेंबर ते 5 डिसेंबर दरम्यान होणार आहे. डेव्हिस चषक स्पर्धेच्या अंतिम फेरीचे यजमानपद माद्रीद शहर भूषविणार आहे. 2022 च्या डेव्हिस चषक टेनिस स्पर्धेच्या रूपरेषेमध्ये बदल करण्यात आला असून अंतिम स्पर्धेसाठी 18 ऐवजी 16 संघांचा समावेश असणार आहे.