मृत गुरुराज हुबळीचा रहिवासी
प्रतिनिधी/ बेळगाव
केरळचा कुख्यात गुंड डॉन तस्लीम खून प्रकरणातील एका संशयिताचा शुक्रवारी रात्री हिंडलगा येथील मध्यवर्ती कारागृहात मृत्यू झाला आहे. हृदयाघाताने त्याचा मृत्यू झाला असावा, असा संशय असून कुटुंबीयांनी मात्र अधिकाऱयांच्या दुर्लक्षपणामुळे त्याचा मृत्यू झाल्याचा आरोप केला आहे.
गुरुराज ऊर्फ गुरू सुरेश दोडमनी (वय 28) रा. गोकुळ रोड, होसूर, हुबळी असे त्याचे नाव आहे. प्रकृती खालावल्याने कारागृह अधिकाऱयांनी सिव्हिल हॉस्पिटलला हलवताना शुक्रवार दि. 4 फेब्रुवारी रोजी रात्री 7.15 वाजण्याच्या सुमारास वाटेतच त्याचा मृत्यू झाल्याचे अधिकाऱयांनी सांगितले.
हुबळी येथील त्याच्या कुटुंबीयांना या घटनेची माहिती देण्यात आली आहे. ते बेळगावात दाखल झाल्यानंतर पंचनामा व उत्तरीय तपासणीच्या प्रक्रियेला सुरुवात झाली. कुटुंबीयांनी कारागृह अधिकाऱयांवर आरोप केला असून चार दिवसांपासून गुरुराज आजारी होता. तरीही त्याच्यावर उपचार करण्यात आले नाहीत. त्यामुळेच त्याचा मृत्यू झाल्याचे त्यांनी सांगितले आहे.
शनिवारी सायंकाळपर्यंत उत्तरीय तपासणीची प्रक्रिया सुरू होती. गुलबर्गा जिल्हय़ातील निलोगी पोलीस स्थानकात दाखल झालेल्या अपहरण व खुनाच्या गुन्हय़ात त्याला अटक झाली होती. 3 एप्रिल 2020 रोजी त्याच्या सहकाऱयांसह त्याला हिंडलगा येथील मध्यवर्ती कारागृहात स्थानबद्धतेत ठेवण्यात आले होते. कैद्याच्या मृत्यूने कारागृहात खळबळ माजली आहे. एपीएमसी पोलीस स्थानकात या घटनेची नोंद झाली आहे. उत्तरीय तपासणी अहवाल उपलब्ध झाल्यानंतर गुरुराजच्या मृत्यूचे नेमके कारण समजणार आहे. त्याचा स्वॅब तपासणी अहवालही पॉझिटिव्ह आल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.
डॉन तस्लीम खून प्रकरणातील गुरुराज हा संशयित आरोपी होता. सी. एम. मुत्तसीम ऊर्फ डॉन तस्लीम (वय 45) हा मूळचा कासरगोड जिल्हय़ातील चंबरिका येथील राहणारा होता. 31 जानेवारी 2020 रोजी गुलबर्गा कारागृहातून जामिनावर सुटका झाली होती. त्यानंतर तस्लीमचे अपहरण करण्यात आले होते. शांतीनगर, बंटवाळ-मंगळूरजवळ त्याचा खून करण्यात आला होता. तस्लीम हा खतरनाक गुन्हेगार होता. मंगळूर येथे वलीमहम्मद शफी (वय 45) व महम्मद अजीम (वय 25) या अफगाणी दरोडेखोरांना सोबत घेऊन त्याने अरुण ज्वेलरी या ज्वेलरी शॉपमध्ये 1 कोटीहून अधिक किमतीचे दागिने लुटले होते. डॉन तस्लीम हा प्रमुख तस्कर होता. त्याचा विरोधक नफाटा रफिक हा दुबईत असतो. रफिकच्या सांगण्यावरून तस्लीमचे अपहरण करून खून करण्यात आल्याचे उघडकीस आले आहे. अशी पार्श्वभूमी असलेल्या डॉन तस्लीम खून प्रकरणातील गुरुराज हा संशयित होता. आता त्याचाही संशयास्पद मृत्यू झाला आहे.