जीवनावश्यक साहित्य पुरविण्यासाठी 50 हजार रुपयांची मदत
प्रतिनिधी/ बेळगाव
कोरोना विषाणूचा प्रसार झपाटय़ाने वाढत असून कॅम्प परिसरात कोरोनाग्रस्त रुग्ण सापडल्याने भीतीचे वातावरण पसरले आहे. सध्या कॅम्प परिसरात खबरदारीच्या उपाययोजना राबविण्यात येत आहेत. येथील रहिवाशांना आवश्यक मदत पुरविण्यासाठी हृदयविकारतज्ञ डॉ. एम. डी. दीक्षित सरसावले आहेत. जीवनावश्यक साहित्य पुरविण्यासाठी कॅन्टोन्मेंट बोर्डला 50 हजार रुपयांची मदत दिली आहे.
सध्या सर्वत्र कोरोनाने थैमान घातले असून प्रसार रोखण्यासाठी लॉकडाऊन करण्यात आले आहे. मात्र, कॅम्प परिसरात कोरोनाग्रस्त रुग्ण आढळल्याने विशेष खबरदारी घेण्यात आली असून नागरिकांना घराबाहेर पडणेही मुश्कील बनले आहे. खबरदारी घेण्यासाठी कॅन्टोन्मेंट बोर्डकडून विशेष उपक्रम राबविण्यात येत आहेत. नागरिकांना आवश्यक सुविधा पुरविण्यासाठी विविध संघटनांनी मदतीचा हात पुढे केला आहे.
कॅन्टोन्मेंटवासियांना जीवनावश्यक साहित्य पुरविण्यासाठी डॉ. एम. डी. दीक्षित यांनी 50 हजार रुपयांची मदत दिली आहे. सदर मदतीचा धनादेश डॉ. एम. डी. दीक्षित यांनी कॅन्टोन्मेंट बोर्डचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री वर्चस्वा यांच्याकडे सुपूर्द केला. यावेळी सदस्य साजिद शेख, कार्यालय अधीक्षक एम. वाय. ताळूकर, अभियंते सतीश मण्णूरकर, नागेश साके आदी उपस्थित होते.