बोरीतील शोकसभेत मान्यवरांच्या भावना
सांस्कृतिक प्रतिनिधी /फोंडा
डॉ. मंजुनाथ बोरकर हे गोव्याच्या वैद्यकीय क्षेत्राला लाभलेले रत्न होते. अवघ्या 44 वर्षांचे आयुष्य त्यांना लाभले. मात्र या अल्पायुषी जीवनात गोमंतकीयांच्या मनात आपल्या चिरकालीन स्मृती मागे ठेऊन ते गेले आहेत. अखेरच्या श्वासापर्यंत त्यांनी रुग्णांची सेवा केली. त्यांच्या जाण्याने वैद्यकीय क्षेत्राची झालेली अपरिमित हानी भरुन यायला बराच काळ जाईल, अशा भावना मान्यवरांनी व्यक्त केल्या. हल्लीच दिवंगत झालेले गोव्यातील सुप्रसिद्ध हृदयरोगतज्ञ डॉ. मंजुनाथ देसाई यांना त्यांच्या बोरी गावात श्रद्धांजली वाहण्यात आली.
बोरी येथील नवदुर्गा सभागृहात झालेल्या शोकसभेला राजकीय, वैद्यकीय व सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांसह त्यांचे चाहते व मित्रपरिवार मोठय़ासंख्येने उपस्थित होता. डॉ. मंजुनाथ हे देवदूत होते. रुग्णांची मनोभावे त्यांनी सेवा केली. त्यांच्याकडे येणाऱया प्रत्येक रुग्णाच्या मानसिकतेचा आणि वेदनेचा त्यांना अचूक अंदाज येई. वैद्यकीय क्षेत्रात त्यांनी दिलेल्या योगदानाच्या स्मृती कायम जपण्यासाठी गोमेकॉच्या कार्डियाक विभागाला त्यांचे नाव दिल्याचे केंद्रीय पर्यटन राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांनी सांगितले. माजी मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी डॉ. देसाई हे सद्गुणांचा परिपाठ असलेले आरोग्य क्षेत्रातील दैवत होते. रुग्णाचे मनोबल वाढविणे आणि त्याच्यात नव्याने जगण्याची उर्मी तयार करण्याचे पुण्य त्यांच्या हातून घडले.
शिरोडय़ाचे आमदार सुभाष शिरोडकर म्हणाले, डॉ. सखाराम गुडे, डॉ. विठ्ठलराव शिरोडकर, डॉ. गोपिनाथ सावकार आदींच्या सामाजिक कार्याचा वसा डॉ. मंजुनाथ देसाई यांनी पुढे चालविला. वैद्यकीय क्षेत्रासाठी त्यांचे कार्य आर्दश होते. प्रतिभा प्रेन्ड्स सर्कलचे अध्यक्ष जयंत मिरींगकर म्हणाले डॉ. मंजुनाथ हे संवेदनशिल व मानवधर्माचे पुरस्कर्ते होते. रुग्णसेवेत त्यांनी वेळकाळ पाहिला नाही. डॉ. शिरीष बोरकर यांनी आपण अत्यंत जवळचा सहकारी गमावल्याची भावना व्यक्त केली. नेहमीच प्रसन्न मुद्रा, उत्साह आणि इच्छाशक्तीने ते ओथंबलेले असत. त्यांच्या अकाली जाण्याने रुग्णांचीच नव्हे, तर वैद्यकीय क्षेत्रातील आम्हा सहकाऱयांचेही आतोनात नुकसान झाले आहे.
नवदुर्गा देवस्थानचे अध्यक्ष श्याम प्रभूदेसाई यांनी डॉ. मंजुनाथ देसाई यांच्या तसबिरीला पुष्पहार अर्पण केला. श्री नवदुर्गा देवस्थानचे महाजन असलेल्या डॉ. मंजुनाथ यांच्या पिंडात देवत्वाचा अंश होता व त्याची अनुभूती अनेकांनी घेतल्याचे ते म्हणाले.
मानव संसाधन खात्याचे व्यवस्थापकीय संचालक नारायण नावती म्हणाले, आपण एक प्रामाणिक मित्र गमावला. अध्यात्म, संगीत हे डॉक्टरांचे जिव्हाळय़ाचे विषय होते. त्यांची बौद्धिक पातळी आणि वागणूक ही सामान्यातल्या सामन्यालाही भुरळ घलणारी होती.
माजी खासदार ऍड. नरेंद्र सावईकर, नाना बेहरे, मिनानाथ उपाध्ये, जयेश बोरकर, नमेश वर्दे, शैलेश बोरकर, सुरेश प्रभूदेसाई, रामदास सराफ, परिमल सामंत, राजेंद्र देसाई, अभय प्रभू , शिवराय प्रभू, हृदयनाथ शिरोडकर, डॉ. जगन्नाथ कोलवाळकर, डॉ. राजन लांबोर, डॉ. अनुपा बोरकर, ऍड. मनोज भांडणकर, रत्नाकर देसाई आदींनी डॉ. मंजुनाथ देसाई यांना यांच्या स्मृतींना उजाळा देऊन त्यांना श्रद्धांजली वाहिती. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी पाठविलेला शोकसंदेश दीपा मिरींगर यांनी यावेळी वाचून दाखविला.