प्रतिनिधी/ सातारा
निलंबनानंतर सातारा जिल्हा रुग्णालयाचे जिल्हा शल्यचिकित्सक आमोद गडीकर यांना महाराष्ट्र शासनाच्या आरोग्यसेवा आयुक्तालयाने बुधवारी सक्तीच्या रजेवर पाठवले आहे. दरम्यान, जिल्हा शल्यचिकित्सक पदाचा अतिरिक्त कार्यभार डॉ. सुभाष चव्हाण यांच्याकडे सोपविण्यात आला आहे. चव्हाण यांनी बुधवारी रात्री उशिरा या पदाचा कार्यभार स्वीकारला.
सातारा जिल्हा ग्रामीण रुग्णालयाचे जिल्हा शल्यचिकित्सक आमोद गडीकर यांच्याबाबत सातत्याने तक्रारींचा सूर वाढला होता. त्यांच्याविरुद्ध अनेक आंदोलनेही झाली होती. जिल्हा रुग्णालयातील कोरोना सेंटरमधून उपचार घेणाऱया कोरोनाबाधित व्यक्तीचे पलायन, अनुमानित आणि बाधित व्यक्तींवर उपचार केल्यानंतर मोकळी इंजेक्शन्स, सलाईनच्या बाटल्या, सुया आदी कचरा उघडय़ावर टाकून देणे, रुग्णालयाच्या ड्रेनेज पाईपमध्ये मृत अर्भक सापडणे या घडलेल्या सलग तीन घटना प्रसिद्धीमाध्यमांनी प्रकाशझोतात आणल्यानंतर आमोद गडीकर यांच्या अडचणीत वाढ झाली होती.
बुधवारी महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य सेवा आयुक्तालयातील आरोग्य सेवा संचालक श्रीमती डॉ. साधना तायडे यांनी पुणे परिमंडळाच्या आरोग्य सेवा उपसंचालक यांच्यामार्फत जिल्हा शल्यचिकित्सक आमोद गडीकर यांना शासन पत्र पाठवले आहे. त्यामध्ये म्हटले आहे की, डॉ. आमोद गडीकर, जिल्हा शल्यचिकीत्सक, सामान्य रुग्णालय सातारा यांना तत्काळ सक्तीच्या रजेवर पाठविण्यात येत आहे. तसेच सातारा येथील जिल्हा शल्य चिकित्सकपदाचा अतिरिक्त कारभार पाली, जि. रत्नागिरी ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. सुभाष जयसिंग चव्हाण यांच्याकडे सोपविण्यात येत आहे. या आदेशाची तत्काळ अंमलबजावणी करून तसा अहवाल शासन व आरोग्य सेवा आयुक्तालयाला विनाविलंब सादर करण्यात यावा अशा सूचना पत्रात करण्यात आल्या आहेत.
दरम्यान, डॉ. सुभाष जयसिंग चव्हाण हे पाली ग्रामीण रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षक पदावरुन कार्यमुक्त झाले असून ते साताऱयाकडे रवाना झाले आहेत. सातारा येथे दाखल झाल्यानंतर रात्री ते जिल्हा शल्यचिकित्सक पदाचा अतिरिक्त कार्यभार स्वीकारणार आहेत.
मुख्याधिकारी अभिजीत बापट पालिकेत हजर
केवळ 15 दिवसांत मुख्याधिकारी रंजना गगे यांची बदली झाली असून त्यांच्या जागी अभिजीत बापट हे सातारा पालिकेचे नवे मुख्याधिकारी असणार आहेत. बापट हे बुधवारी दुपारी 4 वाजता सातारा पालिकेत हजर झाले आहेत. कर्मचारी, अधिकारी यांच्यातर्फे अभिजीत बापट यांचे स्वागत करण्यात आले.