प्रतिनिधी / पणजी
डॉ. सोमनाथ कोमरपंत यांना म्हणजेच योग्य अशा व्यक्तीला कोकण मराठी परिषदेतर्फे कालिदास पुरस्कार प्रदान करण्यात आल्याचे मत ऍड. रमाकांत खलप यांनी व्यक्त केले. त्यांना हा पुरस्कार यापूर्वीच कोमप, गोवा या संस्थेला प्रदान करायचा होता, परंतु त्यांच्या विनयशील नकारामुळे तो त्यांना प्रदान करणे लांबणीवर पडल्याचे खलप म्हणाले. घरगुती समारंभात त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते.
संस्थेचे अध्यक्ष सागर जावडेकर, कार्याध्यक्ष नारायण महाले, सचिव चित्रा क्षीरसागर, कोषाध्यक्ष अजित नार्वेकर, सदस्य प्रकाश रामचंद्र क्षीरसागर, प्रा. कृष्णाजी कुलकर्णी, सौ. मदाताई कोमरपंत आणि संकल्प महाले आदी उपस्थित होते. या प्रसंगी सागर जावडेकर, प्रा. कृष्णाजी कुलकर्णी, नारायण महाले यांनी आपली मते व्यक्त केली.
डॉ. कोमरपंत सरांनी आपल्याकडे कधीच मोठेपणा न घेता अतिशय नम्रतेने कसे वागावे याचे उदाहरण आम्हाला घालून दिले. त्यांनी प्रत्यक्ष मला शिकवले नसले तरी त्यांच्या सहवासात खूप गोष्टी शिकायला मिळाल्या असे प्रा. कुलकर्णी यांनी सांगितले.
सरांच्या संकोची स्वभावामुळे यापूर्वीच कालिदास पुरस्कार देता आला नाही तरी खलप यांनी पुढाकार घेतल्याने कोमप सोमनाथ कोमरपंत सरांचा यथोचित सन्मान कालिदास पुरस्कार प्रदान करून करू शकल्याचे सागर जावडेकर म्हणाले. सौ. चित्रा क्षीरसागर यांनी आभार मानले.