वृत्तसंस्था/ मेलबर्न
इव्हान डोडिग व फिलिप पोलसेक यांनी विद्यमान विजेत्या जो सॅलिसबरी व राजीव राम यांना पराभवाचा धक्का देत ऑस्ट्रेलियन ओपन ग्रँडस्लॅम स्पर्धेत पुरुष दुहेरीचे जेतेपद पटकावले. दोघांनी एकत्र खेळताना मिळविलेले हे पहिलेच जेतेपद आहे.
क्रोएशियाचा डोडिग व स्लोव्हाकियाचा पोलसेक यांना या स्पर्धेत नववे मानांकन मिळाले होते. त्यांनी ब्रिटनचा सॅलिसबरी व अमेरिकेचा राजीव राम या पाचव्या मानांकित जोडीवर 6-3, 6-4 अशी मात केली. ‘ही स्पर्धा आमच्यासाठी संस्मरणीय ठरली. एकत्र खेळताना मिळविलेले हे आमचे पहिलेच जेतेपद असून आम्ही त्याचा खूप आनंद लुटला. हीच घोडदौड पुढेही चालू राहील, अशी मी आशा करतो,’ असे डोडिग नंतर म्हणाला. त्यांनी जेतेपद मिळविल्यामुळे सॅलिसबरी व राम यांना या स्पर्धेचे जेतेपद राखण्यात यशस्वी ठरणारी बॉब व माईक ब्रायन बंधूं यांच्यानंतरची पहिली जोडी होण्याचा मान मिळविता आला नाही. विशेष म्हणजे ब्रायन बंधूंनी 2009-11 असे सलग तीन वर्षे या स्पर्धेचे जेतेपद मिळविण्याचा पराक्रम केला आहे.
राजीव रामचे दुहेरी मुकुट मिळविण्याचे स्वप्नही या पराभवामुळे हुकले आहे. शनिवारी त्याने बार्बरा क्रेसिकोव्हासमवेत मिश्र दुहेरीचे जेतेपद पटकावले होते. पोलसेकचे हे पहिलेच ग्रँडस्लॅम जेतेपद असून ग्रँडस्लॅममध्ये जेतेपद पटकावणारा स्लोव्हाकियाचा तो दुसरा टेनिसपटू आहे. याआधी डॅनिएला हंतुकोव्हाने ग्रँडस्लॅमची मिश्र दुहेरीतील चार अजिंक्यपदे पटकावली आहेत. डोडिगने याआधी 2015 मध्ये पेंच ग्रँडस्लॅममध्ये मार्सेलो मेलोसमवेत जेतेपद पटकावले होते.