ऑनलाईन टीम / मुंबई :
ड्रग्ज प्रकरणी एनसीबीकडून सुरू असलेल्या तपासाने वेग घेतला आहे. आतापर्यंत अनेकांची चौकशीही करण्यात आली आहे. दरम्यान ड्रग्ज प्रकरणी एनसीबीकडून अजून एक अटक करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईतील प्रसिद्ध ‘मुच्छड पानवाला’ दुकानाच्या मालकाला बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. एनसीबीकडून सोमवारी रात्री ही कारवाई करण्यात आली. ड्रग्ज प्रकरणात पानवाल यांचे नाव समोर आल्यानंतर एनसीबीकडून त्याची चौकशी करण्यात आली.
जयशंकर तिवारी यांना ‘मुच्छड पानवाला’ या नावाने ओळखले जाते. अनेक हायप्रोफाइल उद्योजक, सेलिब्रेटी तसेच क्रिकेटर मुच्छड पानवाल्याचे ग्राहक आहेत. ड्रग्ज प्रकरणात ब्रिटीश नागरिक करण सजनानीच्या अटकेनंतर करण्यात आलेल्या चौकशीत मुच्छड पानवाल्याचे नाव समोर आले होते. खारमध्ये राहणारा हा ब्रिटीश नागरिक आंतरराष्ट्रीय आणि आंतरराज्य ड्रग्ज रॅकेट चालवत असल्याचा आरोप आहे.
एनसीबीने वांद्रे येथून करण सजनानी आणि बॉलीवूड अभिनेत्रीची पूर्व मॅनेजर राहिला फर्निचरवाला यांना गांजासह अटक केली होती. यावेळी करण सजनानी याच्याकडून मुच्छड पानवाल्याला गांजा पुरवला जात होता अशी माहिती चौकशीत समोर आली. राहिला फर्निचरवालासुद्धा मदत करत होती असे एनसीबीचे म्हणणे आहे. यानंतर एनसीबीकडून सोमवारी मुच्छड पानवाल्याची चौकशी करण्यात आली आणि नंतर अटकेची कारवाई झाली.
‘मुच्छड पानवाला’ हा मुंबई आणि देशातील प्रसिद्ध पानवाल्यांपैकी एक आहे. 1970 पासून केम्स कॉर्नर परिसरात मुच्छड पानवाल्याचे दुकान असून दरवर्षी त्याच्या ग्राहकांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत असते. मुच्छड पानवाला महागड्या मर्सिडीज कारमधून फिरतो. विशेष म्हणजे 2016 मध्ये त्याने ग्राहकांकडून ऑनलाइन ऑर्डर घेण्यासाठी वेबसाईटदेखील सुरु केली होती.