बेंगळूर/प्रतिनिधी
अंतर्गत सुरक्षा विभागाचे अधिकारी (आयएसडी) ड्रग्ज रॅकेटमध्ये सहभागी असणारी अभिनेत्री रंजनी राजचा शोध घेत आहेत. आयएसडीच्या अधिकाऱ्यांना समजले की ड्रग रॅकेटमध्ये सहभागी असलेल्या अनेक टीव्ही कलाकारांबद्दल विचारपूस केल्यानंतर रंजनी देखील यामध्ये सहभागी होती. तिला चौकशीसाठी हजर होण्यास नोटीस देण्यात आली होती पण ती फरार आहे. आयएसडीच्या अधिकाऱ्यांनी तिच्या घराच्या दारावर नोटिसा चिटकवली आहे.
रंजनी राज सामाजिक कार्यकर्त्यांमार्फत अंमली पदार्थांचा व्यापार करत असल्याचे तपासात समोर आले आहे. कन्नड चित्रपटसृष्टीशी संबंधित उद्योगपती व राजकारण्यांच्या मुलांना ती ड्रग पुरवठा करत असे. हनी ट्रॅप प्रकरणात रंजनी राजही सहभागी असल्याचे तपासात समोर आले आहे. तिने बर्याच लोकांना ब्लॅकमेल केले आणि कोट्यावधी रुपये कमवले आहेत. पण बदनामीच्या भीतीने लोकांनी पोलीस ठाण्यात तक्रार दिलेली नाही.
पोलिसांना रंजनी मंड्या जिल्ह्यात लपून बसल्याचे समजल्यानंतर तेथे छापा टाकण्याच्या काही मिनिटांपूर्वीच तिने तेथून पळ काढला. बेंगळूर विद्यापीठाच्या ज्ञानभारतीच्या आसपासचा भाग त्यांचा अड्डा असल्याचे पोलिसांना तपासातून कळले आहे. यामध्ये अनेकजण सहभागी आहेत.