बेंगळूर/प्रतिनिधी
राज्यात ड्रग रॅकेट तस्कर प्रकरणी सीसीबी पोलीस तपस करत आहेत. यामध्ये कन्नड अभिनेत्रींनसह काही लोक अटकेत आहेत. पण मुख्य आरोपी मात्र अजूनही फरार आहेत. दरम्यान पोलीस आयुक्त कमल पंत यांनी ड्रग्स व्यवसाय प्रकरणातील तीन प्रमुख आरोपींना अद्याप अटक न केल्याबद्दल नाराजी व्यक्त केली आहे. ड्रग्स रॅकेट प्रकरणातील मुख्य आरोपी शिव प्रकाश, आदित्य अल्वा आणि शेख फाझिल अद्याप सापडलेले नाहीत. हे तीन आरोपी परदेशात पळून गेले की नाही हेही कळू शकलेले नाही.
त्यांना अटक होताच संपूर्ण प्रकरण उघड होईल, अशी पोलिसांना आशा आहे. अटकेनंतर त्यांना ड्रग्ज रॅकेटमध्ये सहभागी नेते, वरिष्ठ सरकारी अधिकारी, चित्रपट जगाशी निगडित अभिनेते, अभिनेत्री याबद्दल महत्वाची माहिती मिळेल. शिवप्रकाश अभिनेत्री रागिणीचा जवळचा मित्र आहे. हेब्बाळ येथील आदित्य अल्वाच्या रिसॉर्टवर पोलिसांनी छापा टाकला परंतु तो आधीच पळाला होता.
शेख फाझिल अभिनेत्री संजनाच्या अटकेनंतर फरार आहे. नवी दिल्ली, सिमला, हैदराबाद, मुंबई, कोलकाता, चेन्नई आणि इतर शहरांमध्ये पोलीस तिघांचा शोध घेत आहेत पण त्यांना शोधण्यात अपयश आहे.