प्रतिनिधी/ चिपळूण
भक्ष्याचा पाठलाग करत विहिरीत पडलेल्या बिबटय़ाचा मृत्यू झाल्याची घटना गुरूवारी सकाळी ढोक्रवली येथे घडली.
ढोक्रवली-सुतारवाडी येथील मनोहर राजाराम महाडिक यांच्या विहिरीवरील वीज मोटर सुरू करण्यासाठी गेलेल्यांना गुरूवारी सकाळी बिबटय़ा पाण्यावर तरंगताना दिसला. याबाबत सावर्डे वनविभागाला कळवल्यानंतर परीक्षेत्र वनाधिकारी सचिन निलख यांच्या मार्गदर्शनाखाली वनपाल राजेश्री कीर, वनसंरक्षक रानबा बंबर्गेकर यांनी मृत बिबटय़ाला ग्रामस्थांच्या मदतीने बाहेर काढले. त्यानंतर त्याला पिंपळी येथील वनविभागाच्या रोपवाटिकेत आणले. पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. एस. जी. नरळे यांनी शवविच्छेदन केले. हा मृत बिबटय़ा साधारण साडेतीन वर्षाचा आणि पूर्ण वाढ झालेला नर होता.