राजकोटमधील दुसऱया वनडेत भारत 34 धावांनी विजयी, धवनसह विराट-केएल राहुलही बरसले
राजकोट / वृत्तसंस्था
कुलदीप यादवने 38 व्या षटकात धोकादायक स्टीव्ह स्मिथसह दोन बळी घेत सामन्याचा सारा नूरच बदलून टाकल्यानंतर भारताने येथील दुसऱया वनडे सामन्यात ऑस्ट्रेलियाला 34 धावांनी धूळ चारली आणि 3 सामन्यांच्या वनडे मालिकेत 1-1 अशी महत्त्वपूर्ण बरोबरी साधली. प्रथम फलंदाजीचे निमंत्रण मिळाल्यानंतर भारताने शिखर धवन (96), विराट कोहली (78), केएल राहुल (52 चेंडूत 80) यांच्या फटकेबाजीमुळे निर्धारित 50 षटकात 6 बाद 340 धावांचा डोंगर रचला तर प्रत्युत्तरात ऑस्ट्रेलियाला स्टीव्ह स्मिथच्या झुंजार खेळीनंतरही 49.1 षटकात सर्वबाद 304 धावांवर समाधान मानावे लागले.
विजयासाठी 341 धावांचा पाठलाग करताना स्टीव्ह स्मिथने 102 चेंडूत 9 चौकार, एका षटकारासह 98 धावांचा झंझावात साकारला. पण, त्याच्याशिवाय, लाबुशाने (46) व काही प्रमाणात ऍरॉन फिंच (33) यांचा अपवाद वगळता अन्य फलंदाज ठरावीक अंतराने बाद होत राहिले आणि ऑस्ट्रेलियाचे वर्चस्व गाजवण्याचे इरादे जमीनदोस्त झाले. धोकादायक डेव्हिड वॉर्नरचा शमीच्या गोलंदाजीवर मनीष पांडेने टिपलेला एकहाती झेल विशेष लक्षवेधी ठरला.
भारताची आव्हानात्मक धावसंख्या
तत्पूर्वी, शिखर धवनचे शतक हुकले असले तरी त्याची व कर्णधार विराट, केएल राहुल यांच्या फटकेबाजीमुळे भारताला आव्हानात्मक धावसंख्या रचता आली. श्रीलंकेविरुद्ध मागील टी-20 सामन्यात सूर सापडलेल्या डावखुऱया धवनने येथे 90 चेंडूतच 13 चौकार व एका षटकारासह 96 धावांची आतषबाजी केली.
पूर्ववत तिसऱया स्थानी फलंदाजीला उतरलेल्या विराट कोहलीने 76 चेंडूत 6 चौकारांसह 78 तर केएल राहुलने चौथ्या स्थानावर 52 चेंडूत 80 धावांची जलद फटकेबाजी केली. त्याच्या खेळीत 6 चौकार व 3 षटकारांचा समावेश राहिला.
रोहित शर्मानेही 44 चेंडूत 6 चौकारांसह 42 धावा फटकावल्या. मात्र, याचे आणखी मोठय़ा खेळीत तो रुपांतर करु शकला नाही. धवन व रोहित या जोडीने यानंतरही 81 धावांची सलामी दिली. धवनने नंतर विराटसह दुसऱया गडय़ासाठी आणखी 103 धावांची भागीदारी साकारली.
विराट कोहली-राहुल यांची 10.3 षटकातील 78 धावांची भागीदारी भारताच्या डावाचे आणखी एक वैशिष्टय़ ठरले. विराटने पॅट कमिन्सला (10 षटकात 0-53) जॅब-फ्लिकचा खेचलेला षटकार लक्षवेधी ठरला. केएल राहुलने मिशेल स्टार्कच्या (10 षटकात 0-78) गोलंदाजीवर काही आकर्षक फटके लगावले.
झाम्पा पुन्हा कोहलीसाठी कर्दनकाळ
कर्णधार विराट कोहली वनडे क्रिकेटमध्ये आपल्या 44 व्या शतकाकडे वेगाने कूच करत होता. पण, ऍडम झाम्पा (10 षटकात 3-50) पुन्हा एकदा त्याच्यासाठी कर्दनकाळ ठरला. मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये झाम्पाने विराटला चक्क सातव्यांदा बाद केले.
धवनचे 18 वे शतक हुकले
डावाच्या प्रारंभी धवनने बॅकड्राईव्हचे दर्जेदार फटके लगावत डावाला आत्मविश्वासाने व आक्रमकतेने सुरुवात केली होती. 50 षटकांच्या क्रिकेटमध्ये येथे त्याने 29 वे अर्धशतक झळकावले. त्याने विशेषतः डावखुरा फिरकीपटू ऍस्टॉन ऍगरवर (8 षटकात 0-63) चांगलाच हल्ला चढवला. पण, त्याचे 18 वे वनडे शतक मात्र अवघ्या 4 धावांनी हुकले. डावातील 29 व्या षटकात केन रिचर्डसनच्या गोलंदाजीवर त्याने फाईन लेगवर तैनात स्टार्ककडे सोपा झेल देत तंबूचा रस्ता धरला. श्रेयस अय्यर (7) स्वस्तात बाद झाला. पण, कोहलीने उत्तम फटकेबाजी करत असतानाच एकेरी-दुहेरी चोरटय़ा धावा घेण्यातही सातत्य राखले आणि यामुळे ऑस्ट्रेलियावर दडपण कायम राहिले होते.
धावफलक
भारत : रोहित शर्मा पायचीत गो. झाम्पा 42 (44 चेंडूत 6 चौकार), शिखर धवन झे. स्टार्क, गो. रिचर्डसन 96 (90 चेंडूत 13 चौकार, 1 षटकार), विराट कोहली झे. स्टार्क, गो. झाम्पा 78 (76 चेंडूत 6 चौकार), श्रेयस अय्यर त्रि. गो. झाम्पा 7 (17 चेंडूत 1 चौकार), केएल राहुल धावचीत (कॅरे) 80 (52 चेंडूत 6 चौकार, 3 षटकार), मनीष पांडे झे. ऍगर, गो. रिचर्डसन 2 (4 चेंडू), रविंद्र जडेजा नाबाद 20 (16 चेंडूत 1 चौकार), मोहम्मद शमी नाबाद 1 (1 चेंडू). अवांतर 14. एकूण 50 षटकात 6 बाद 340.
गडी बाद होण्याचा क्रम
1-81 (रोहित, 13.3), 2-184 (धवन, 28.4), 3-198 (श्रेयस, 32.4), 4-276 (विराट, 43.1), 5-280 (मनीष, 44.1), 6-338 (केएल राहुल, 49.4).
गोलंदाजी
पॅट कमिन्स 10-1-53-0, मिशेल स्टार्क 10-0-78-0, केन रिचर्डसन 10-0-73-2, ऍडम झाम्पा 10-0-50-3, ऍस्टॉन ऍगर 8-0-63-0, लाबुशाने 2-0-14-0.
ऑस्ट्रेलिया : डेव्हिड वॉर्नर झे. पांडे, गो. शमी 15 (12 चेंडूत 2 चौकार), ऍरॉन फिंच यष्टीचीत राहुल, गो. जडेजा 33 (48 चेंडूत 3 चौकार), स्टीव्ह स्मिथ त्रि. गो. कुलदीप 98 (102 चेंडूत 9 चौकार, 1 षटकार), लाबुशाने झे. शमी, गो. जडेजा 46 (47 चेंडूत 4 चौकार), ऍलेक्स कॅरे झे. कोहली, गो. कुलदीप 18 (17 चेंडू), ऍस्टॉन टर्नर त्रि. गो. शमी 13 (15 चेंडू), ऍस्टॉन ऍगर पायचीत गो. सैनी 25 (25 चेंडूत 3 चौकार), पॅट कमिन्स त्रि. गो. शमी 0 (1 चेंडू), मिशेल स्टार्क झे. राहुल, गो. सैनी 6 (11 चेंडू), रिचर्डसन नाबाद 24 (11 चेंडूत 4 चौकार, 1 षटकार), ऍडम झाम्पा झे. राहुल, गो. बुमराह 6 (6 चेंडूत 1 चौकार). अवांतर 20. एकूण 49.1 षटकात सर्वबाद 304.
गडी बाद होण्याचा क्रम
1-20 (वॉर्नर, 3.2), 2-82 (फिंच, 15.1), 3-178 (लाबुशाने, 30.5), 4-220 (कॅरे, 37.2), 5-221 (स्मिथ, 37.5), 6-259 (टर्नर, 43.1), 7-259 (कमिन्स, 43.2), 8-274 (ऍगर, 46.1), 9-275 (स्टार्क, 46.3), 10-304 (झाम्पा, 49.1).
गोलंदाजी
बुमराह 9.1-2-32-1, शमी 10-0-77-3, नवदीप सैनी 10-0-62-2, रविंद्र जडेजा 10-0-58-2, कुलदीप यादव 10-0-65-2.
रोहित, शिखर धवनला दुखापत
या लढतीदरम्यान रोहित शर्मा व शिखर धवन या उभयतांनाही दुखापती झाल्या. प्रथम फलंदाजी करत असताना पॅट कमिन्सचा चेंडू बरगडीवर आदळल्याने क्षेत्ररक्षणाला उतरु शकला नाही तर नंतर क्षेत्ररक्षण करत असताना रोहित शर्मा सीमारेषेनजीक डीप पॉईंटवर चौकार अडवण्याच्या प्रयत्नात डाईव्ह मारल्यानंतर दुखापतग्रस्त झाला. त्याच्या डावा हात यावेळी दुखावला. नंतर फिजीओ नितीन पटेलसह तो बाहेर गेला आणि उर्वरित खेळात त्याच्याऐवजी केदार जाधव क्षेत्ररक्षणाला उतरला होता.
ब्लर्ब
उभय संघातील तिसरी, निर्णायक वनडे उद्या (रविवार) बेंगळुरात होईल.
रोहितने गाठला सात हजार धावांचा टप्पा
राजकोट येथे झालेल्या दुसऱया वनडे सामन्यात भारताने ऑस्ट्रेलियावर 36 धावांनी विजय मिळवला. या सामन्यात भारताचा स्टार सलामीवीर रोहित शर्माने या सामन्यात खेळताना सलामीवीर फलंदाज म्हणून वनडेत 7000 धावांचा टप्पा पार केला आहे. त्याने 137 व्या वनडे डावात सलामीला खेळताना हा टप्पा पार केला आहे. त्यामुळे तो वनडेमध्ये सर्वात जलद 7000 धावा करणारा सलामीवीर फलंदाज ठरला आहे. हा पराक्रम करताना दक्षिण आफ्रिकेचा माजी सलामीवीर फलंदाज हाशिम अमलाला मागे टाकले आहे. अमलाने 147 डावात सलामीला फलंदाजी करताना 7000 वनडे धावांचा टप्पा पार केला होता.
वनडेत सर्वात जलद 7000 धावा करणारे सलामीवीर फलंदाज
रोहित शर्मा – 137 डाव
हाशिम आमला – 147 डाव
सचिन तेंडुलकर – 160 डाव